नागपूर - काँग्रेसमध्ये अंतर्गत कलहातून राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी काँग्रेस पक्षाशी बेईमानी करणाऱ्यांना लाथा हाणा अशी चिथावणी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिली. यावर मंत्री सुनील केदार यांना विचारले असता त्यांनी आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे सांगितले. केदार जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी आले असता प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
रविवारी नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या कार्यालयात जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकी संदर्भात आयोजित पक्षाच्या बैठकी दरम्यान बैठकीत पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना मंत्री सुनील केदार म्हणाले की, कॉंग्रेसचा कितीही मोठा नेता असेल आणि पक्षाशी बेईमानी करत असेल तर त्याला गाडीतून उतरवा आणि दोन लाथा हाणा, तुमच्यावर पोलीस केस झाली, तर मी पाहून घेईन, असे वादग्रस्त वक्तव्य केले. यामुळे काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह पुन्हा एकदा समोर आला आहे.
हे ही वाचा -'मिस पिंपरी-चिंचवड'च्या मानकरी ठरलेल्या विशाखा यांची गळफास घेऊन आत्महत्या
केदार समर्थकांचा आशिष देशमुख विरोधात राग -
दोन दशक जुने नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 150 कोटी रुपयाच्या घोटाळ्याच्या प्रकरणाला धरून आशिष देशमुख यांनी सुनील केदार यांना मंत्रिमंडळातून काढण्याची मागणी केली होती. यामुळे काँग्रेस पक्षात दोन्ही गटात वाद सुरू झाला. तेच केदार यांचे समर्थक चांगलेच संतापले असताना दोन दिवसापूर्वी झालेल्या ग्रामीण काँग्रेसच्या बैठकीत त्याचे पडसाद उमटून आले. यात मंत्री केदार यांच्या वक्तव्याने त्याला अधिक पाठबळ मिळाले.
हे ही वाचा - लेटरवॉर.. राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर; म्हणाले राज्यपालांची 'ही' कृती संसदीय लोकशाहीला मारक
आशिष देशमुख यांना काढण्यासंदर्भात पक्षश्रेष्ठींनी निर्णय घ्यावा -
या बैठकीत केदार समर्थकांनी आशिष देशमुख यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना पक्षातून काढावे, अशी मागणी करत चक्क ठराव पारित करून घेतला आहे. या आशिष देशमुख यांना पक्षातून काढण्यासंदर्भात ठराव पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आला होता. आता श्रेष्ठींनी त्यासंदर्भात योग्य निर्णय करावा, अशी मागणी केदार समर्थक आणि नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी केली आहे.