नागपूर - पहिल्यांदा भारतीय जनता पक्ष आणि त्यानंतर शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यात अपयश आल्यानंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्ता स्थापन करेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांनि कॉमन मिनिमम प्रोग्रॅम ठरवायचा आहे. आमचे केंद्रीय नेते मुंबईत दाखल झाले असून ते सत्ता स्थापनेचा तिढा सोडवतील अशी माहिती माजी मंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे.
काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी पाठवलेले केंद्रीय नेते मुंबईत दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही चर्चा करतील त्यानंतरच सत्तेत सहभागी व्हायचं की नाही यावर निर्णय होणार असल्याची माहिती नितीन राऊत यांनी दिली आहे. सर्व काही ठीक राहिल्यास आज कॉमन मिनिमम प्रोग्राम निश्चित होईल त्यानंतर सत्तेचा तिढा सोडवला जाईल. ते म्हणाले काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असून पक्षाचे एक धोरण ठरलेले आहे ते धोरण केवळ एका राज्यापुरते मर्यादित नसून देश पातळीचा विचार करावा लागतो त्यामुळे सर्व बाबीचा विचार केल्यानंतरच निर्णय घेतला जाईल असे देखील ते म्हणाले आहेत. काँग्रेसला उपमुख्यमंत्री पद मिळाल्यास दलित चेहरा समोर केला जाईल का यावर त्यांनी सूचक उत्तर देत या संदर्भात निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी घ्यायचा असल्याचे सांगितले आहे.