नागपूर - नागपूर महानगर पालिका संचालित पाचपावली कोविड रुग्णालयामध्ये मनपा कडून पहिल्या ऑक्सिजन टँकची निर्मिती करण्यात आली आहे. ऑक्सिजनच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल असल्याची माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली आहे.
लिक्विड ऑक्सिजन टँकची व्यवस्था करणारे मनपाचे पहिले रुग्णालय
नागपूर महानगर पालिकेतर्फे पाचपावली सूतिका गृह परिसरामध्ये ११० खाटांचे कोव्हिड रुग्णालय (DCHC) काल पासून सुरु करण्यात आले आहे. सर्व खाटांसाठी ऑक्सिजनची सुविधा करण्यात आली आहे. मनपातर्फे या रुग्णालयासाठी लिक्विड ऑक्सिजन टँक सुध्दा लावण्यात आले आहे. कोविड रुग्णांसाठी लिक्विड ऑक्सिजन टँकची व्यवस्था करण्यात आलेले हे मनपाचे पहिले रुग्णालय आहे. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती संजय महाजन, अतिरिक्त आयुक्त राम जोशी आणि वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. त्यांनी व्यवस्थेची पाहणी केली.
ऑक्सिजनसाठी धावाधाव होणार नाही - महापौर
'नागपूर महानगर पालिका आता ऑक्सिजनच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. येथे आता ऑक्सिजन सिलेंडरच्या पुरवठयासाठी धावपळ होणार नाही. आसरा फाउंडेशच्या आसरा चॅरीटेबल मल्टीस्पेशिलिटी क्लीनिक, शांतिनगर संस्थेमार्फत या रुग्णालयाच्या संचालनात मदत होणार आहे', असे महापौर म्हणाले आहेत.
हेही वाचा - सचिन वाझे पोलीस सेवेतून बडतर्फ, मुंबई आयुक्तांची कारवाई