नागपूर - खेळताना पाळण्याच्या दोरीमुळे गळफास लागून एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील कोंढाळी पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या मासोद गावात घडली आहे. अकरा वर्षीय पीयूष धारापुरे असे त्या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी मृत पीयूषची आई माहेरी गेली होती तर वडील दुखापतग्रस्त असल्याने ते विश्रांती घेत असल्याची माहिती पुढे आली आहे.
अकस्मात मृत्यूची नोंद
दुपारच्या वेळेत पीयूष हा पाळण्यात खेळत होता, त्याचवेळी त्याला खेळला खेळता गळफास लागला. त्या खोलीत कुणीही नसल्याने तो कुणालाही मदतीसाठी बोलावू शकला नाही. त्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. आवाज येत नसल्याने त्याच्या वडिलांनी आतील खोलीत जाऊन बघितले, तेव्हा तो दोरीला अडकलेला होता. त्याला लगेच रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती समजताच कोंढाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
'पीयूषच्या मृत्यूला त्याचे वडील जबाबदार'
पीयूषचा गळफास लागून मृत्यू झल्याची माहिती समाजात त्याची आई आणि मामा हे मासोद गावात दाखल झाले होते. त्यावेळी पीयूषच्या मृत्यूला त्याचे वडील जबाबदार असल्याचा आरोप मामाने केला आहे. यासंदर्भात त्यांनी कोंढाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.