नागपूर - शिवस्मारक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची गरज नाही. त्याऐवजी रुग्णालय उभारून त्यांची नावे द्या, अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. मात्र, आमच्या डोक्यात फक्त मते कसे मिळतील? हेच असते. कोणत्या स्मारकामागे किती मते आहेत? हेच आम्ही पाहत असतो, असा टोला त्यांनी सर्व राजकारण्यांना लगावला. विधानसभेत विदर्भाचे मुद्दे मांडताना ते बोलत होते.
अखंड महाराष्ट्र बाळासाहेबांची भूमिका होती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचा शब्द बाळासाहेबांना दिला होता. मात्र, अखंड महाराष्ट्र ही बाळासाहेबांची भूमिका होती. त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्र टिकवून ठेवावा, ही जबाबदारी उद्धव ठाकरेंची आहे. विदर्भ महाराष्ट्रात राहू द्यायचा असेल तर, संयुक्त महाराष्ट्रात आजपर्यंत जे मिळाले नाही, ते सर्व देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी करावा. भाजपने वेगळ्या विदर्भाचा झेंडा सोडला. मात्र, विदर्भाच्या विकासासाठी प्रयत्न करावे लागतील.
विदर्भात डझनभर मंत्री असताना विदर्भ सिंचनाच्या दृष्टीने मागास
अजित पवारांसारखे दिग्गज जलसंपदा मंत्री झाले. मात्र, अद्यापही विदर्भ सिंचनाच्या दृष्टीने मागासलेलाच आहे. विदर्भामध्ये डझनभर मंत्री असताना सिंचनामध्ये वाढ झाली नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, त्यासाठी मुख्यमंत्र्यांवर ३०६ चा गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे मुनगंटीवार म्हणाले होते. मात्र, अद्यापही शेतकरी आत्महत्या कमी झाल्या नाही. उलट वाढतच चालल्या आहेत.
आरोग्याची सेवा देऊ शकत नसेल, तर सरकार कोणत्या कामाचे
चाकण उद्योग क्षेत्राचा विचार केला, तर अनेक उद्योग धंदे आहेत. मात्र, आमच्याकडे एमआयडीसी ओसाड पडल्या आहेत. येथे प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला भांडावं लागतेय. अद्यापही चांगले रुग्णालय नाही. शिक्षणासाठी पुण्याला जावे लागते. सध्या आरोग्याची सेवा आपण देऊ शकत नाही, तर सरकार कोणत्या कामाचे?, असा सवालही बच्चू कडूंनी उपस्थित केला.
मुख्यमंत्र्यांनी शेवटच्या दोन तासात षटकार किंवा चौकार तरी मारावा
विदर्भामध्ये पॉवर स्टेशन उभारले नाही. १३२ केबीचे केंद्र उभारले नाही. आम्ही त्यासाठी लढतो. अनेक तालुके विकासापासून दूर आहे. मात्र, ६ दिवसाच्या अधिवेशनाच्या सत्रात विदर्भाला काहीच मिळाले नाही. आतातरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शेवटच्या दोन तासात एखादा षटकार नाहीतर चौकार तरी मारला पाहिजे.
विदर्भाला काय मिळाले, असे अनेकजण विचारतात. मात्र, या अधिवेशनाच्या दिवसात विदर्भाला फक्त चहा पाण्याची टपरी मिळाली. महाराष्ट्राच्या टोकावर असणाऱ्या जिल्ह्यामध्ये काय अवस्था आहे? हे पाहणे महत्वाचे आहे. मुंबई आणि गडचिरोलीमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करा.