नागपूर : नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी दोन हजारांपेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. रविवारी नागपुरात तब्बल 2252 नवे कोरोनाग्रस्त आढळले. संचारबंदीला सुरूवात होण्यापूर्वी नागपुरात कोरोना रुग्णसंख्येचा विक्रम बघायला मिळाला आहे.
रविवारी रुग्णसंख्येचा उच्चांक
नागपुरात रविवारी 2252 तर शनिवारी 2261 रुग्ण आढळले होते. तर 1 हजार 33 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. 12 जणांचा रविवारी कोरोनामुळे मृत्यु झाला. मृतांमध्ये नागपूर शहारातील 7 जण, ग्रामीण भागातील 3, तर बाहेर जिल्ह्यातील 2 जणांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यात रविवारी 12 हजार 675 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी 2 हजार 252 अहवाल पॉझिटिव्ह आढळले. यामुळे जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्या वाढली आहे.
1 आठवड्याची संचारबंदी
वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी नागपुरात एक आठवड्याची संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. याला सोमवारपासून सुरूवात होणार आहे. त्यामुळे संचारबंदीमुळे कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळण्यात मदत होईल अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे. दरम्यान कोरोनाला आळा घालण्यासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे.
पूर्व विदर्भातही रुग्णसंख्या वाढतीच
पूर्व विदर्भात 2 हजार 782 नवे कोरोनाग्रस्त आढळले असून 19 जणांच्या मृत्युची नोंद झाली आहे. यात नागपूर जिल्ह्यातील 12, वर्ध्यात 6 आणि भंडाऱ्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. पूर्व विदर्भात वर्ध्यात 278 नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तर चंद्रपूर जिल्ह्यात 118, भंडाऱ्यात 70, गोंदियामध्ये 41, गडचिरोलीत 23 नवे कोरोनाग्रस्त आढळले. रविवारी पूर्व विदर्भातील 1189 जणांना उपचारानंतर सुटी देण्यात आली.
हेही वाचा - राज्याची चिंता वाढवणारी आकडेवारी; रविवारी 16 हजाराहून अधिक कोरोनाबाधित