मुंबई - कोरोनाकाळात पश्चिम रेल्वे सर्व कर्मचारी-अधिकारी जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम करत आहेत. तर, आता पावसाळ्यापूर्वीची दुरुस्तीची कामे करण्यासाठी कर्मचाऱ्यांना सज्ज व्हायचे आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या 29 हजार कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मागणी, पश्चिम रेल्वेच्या प्रधान मुख्य आरोग्य संचालकांनी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान मुख्य सचिवांना पत्र लिहून केली आहे.
पावसाळ्याचा दृष्टीने काळजी
पश्चिम रेल्वेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाचा धोका असतानाही दिवसाचे 24 तास अविरतपणे प्रवाशांना सेवा देत आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांना पावसाळ्याच्या तोंडावरील दुरूस्तीची कामे करावयाची आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तसेच त्यांच्याकडून नागरिकांसाठी योग्यप्रकारे सेवा बजावता यावी, यासाठी त्यांचे लसीकरण गरजेचे आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबीयांसोबत पश्चिम रेल्वेच्या जगजीवन राम रुग्णालयात लसीकरणाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.
रेल्वेच्या हॉस्पिटल्समध्ये लसी ठेवण्याची सुविधा
जगजीवन राम रुग्णालयात लसी ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णालयात लसी पुरवून सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांची ओळखपत्रे तपासून त्यांचे लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी पश्चिम रेल्वेचे प्रधान मुख्य आरोग्य संचालक डॉ. छत्र सिंह आनंद यांनी राज्य सरकारला लिहिलेल्या पत्रात केली आहे.