मुंबई : मुंबई, ठाणे जिल्ह्यात उद्या मंगळवारी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातही जोरदारपणे पाऊस कोसळणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर यांनी ही माहिती दिली.
उद्या (२२ सप्टेंबर) मुंबई व ठाणे जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. पश्चिम घाट परिसरातील रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
राज्यात पुढील २४ तासात सर्वदूर पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणात अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगाल उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुधवारी आणि गुरुवारी पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात ढगाळ हवामान आहे. अधूनमधून ऊन पडत असले, तरी सायंकाळनंतर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत आहे.