मुंबई - आम्ही राजकारणी लोक केवळ स्वप्न ( Politicians Shows Only Dream ) दाखवतो. मात्र, सत्यात उतरवणारे तुम्ही आहात. राज्याला विकासाच्या मार्गावर अग्रेसर ठेवायचे असेल तर सर्वजणांनी कर्तव्याप्रती समर्पित राहून काम करावे. आपली निष्ठा राज्य, देश आणि सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी असायला हवी, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज ( 21 एप्रिल ) नागरी सेवा दिनानिमित्ताने राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानातील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण सोहळा पार पडला. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, खासदार अरविंद सावंत, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, राज्यभरातील पुरस्कार प्राप्त अधिकारी आणि कर्मचारी, शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कोरोना काळात माझ्या गावपातळीपासून राज्य पातळीपर्यंतच्या प्रशासकीय यंत्रणेतील प्रत्येक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी अतिशय उत्तम काम केल्याने या संकटाचा मुकाबला करू शकलो. तसेच, सर्वांनी जीव धोक्यात घालून, कुटुंबापासून दूर जाऊन, रस्त्यांवर उतरून काम केले. त्यामुळे कोरोनाच्या संकटावर आपल्याला मात करता आली. अनेक नियमांत न बसणाऱ्या मागण्या करण्यात आल्या. ज्या शक्य होत्या त्या मान्य केल्या. परंतु, राज्याच्या विकासाचा गाडा वेगवान करताना, कोरोना काळात जनतेच्या रक्षणासाठी लॉकडाऊन असो किंवा मास्कची सक्ती आदी अनेक गोष्टींना नकार दिल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.
आम्ही राजकारणी स्वप्न दाखवणारी माणसं आहोत. पण, ही स्वप्नं सत्यात आणणारी आणि जमिनीवर मजबूतपणे उभे राहून काम करणारी माणसे तुम्ही सर्वजण आहात. दर पाच वर्षांनी आम्हाला आमच्या प्रगतीचा आढावा जनतेसमोर मांडायचा असतो. मात्र, या प्रगतीची गती ठरवणारे आणि राज्याला विकासाकडे घेऊन जाणारे तुम्ही सर्वजण आहात. सर्व सामान्य माणसाच्या डोळ्यातील दु:खाचे अश्रू पुसले जाऊन जेंव्हा त्याची जागा आनंदाचे अश्रू घेतात. तेंव्हा प्रशासन चांगले काम होते, असे मानणारा मी असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
अलिकडे काही निरीक्षणे जाहीर झाली आहेत. त्यात ज्या राज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे. ज्या राज्याच्या स्थुल राज्य उत्पन्नात चांगली वाढ होत आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. हे सगळे माझ्या चांगल्या सहकाऱ्यांमुळे शक्य झाले आहे. माझ्या कुटुंबातील सर्वजण समजूतदार आहेत. त्यामुळे मला माझे हे मोठे कुटुंब सांभाळणे शक्य होत आहे. तसेच प्रशासकीय कामात सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे सुलभता आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.