मुंबई - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कोरोनाची तीव्र लक्षणे नसून खबरदारी म्हणून ते रुग्णालयात दाखल होणार आहेत. आठवले यांनी 'गो कोरोना गो'चा नारा दिला होता. यामुळे त्यांना थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली होती. आता त्यांचाच कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रामदास आठवलेंवर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार होत आहेत. पक्षाच्या यापुढील सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.
फडणवीस, अजित पवार अन् तटकरेंनंतर आता आठवले -
राज्यातील कोरोनाबाधित राजकीय नेत्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. आज सकाळीच रायगडचे खासदार सुनील तटकरे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. तटकरे यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. त्यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. तटकरे, पवार आणि फडणवीस तिघेही ब्रिच कॅन्डी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यानंतर आता आठवलेंचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
राज्यातील या नेत्यांनाही कोरोना झाला होता -
देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, जितेंद्र आव्हाड, अस्लम शेख, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, अब्दुल सत्तार, सुनील केदार, बाळासाहेब पाटील, हसन मुश्रीफ, प्राजक्त तनपुरे, बच्चू कडू, मकरंद पाटील, किशोर जोरगेवार, ऋतुराज पाटील, प्रकाश सुर्वे, पंकज भोयर, माणिकराव कोकाटे, मुक्ता टिळक, वैभव नाईक, सुनील टिंगरे, किशोर पाटील, यशवंत माने, मेघना बोर्डीकर, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, चंद्रकांत जाधव, रवी राणा, अतुल बेनके, प्रकाश आवाडे, अभिमन्यू पवार, माधव जळगावकर, कालिदास कोलंबकर, महेश लांडगे, मोहन हंबरडे, अमरनाथ राजूरकर, मंगेश चव्हाण, गीता जैन, सरोज अहिरे, सदाभाऊ खोत, सुजीत सिंग ठाकूर, गिरीश व्यास, नरेंद्र दराडे या नेत्यांना या पूर्वी कोरोना झाला आहे.