मुंबई - कर्नाटकमधील काही आमदार आणि मंत्र्यांच्या राजीनाम्यावरून देशभरात बरेच राजकीय वादळ निर्माण झाले आहे. काँग्रेस आणि जनता दल (सेक्युलर)चे सरकार अडचणीत सापडल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक योगेश त्रिवेदी म्हणाले, की कर्नाटकात ज्या राजकीय घडामोडी सुरू आहेत, त्यावरून कोणताही राजकीय पेचप्रसंग निर्माण झालेला नाही. केवळ दोन्ही पक्षांनी मिळून एक राजकीय अस्थिरता निर्माण केली असल्याचे ते म्हणाले.
जनता दल (सेक्युलर) आणि काँग्रेसच्या ज्या मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत, आणि ज्यांच्या ज्यांच्या बातम्या येत आहेत. ते सर्व पाहिल्यास हे राजीनामे त्यांनी कोणाला दिलेत हे महत्वाचे आहे. त्यांनी राजीनामे मुख्यमंत्री आणि राज्यपालांकडे दिलेले नाहीत. त्यामुळे आपले राजीनामे हे जोपर्यंत मुख्यमंत्र्यांना अथवा आणि राज्यपालांना देणार नाहीत तोपर्यंत इथे राजकीय पेचप्रसंग निर्माण झालेली आहे, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे कर्नाटकात केवळ राजकीय अस्थिरता आहे, असेच म्हणता येईल.