मुंबई - कर्रss कर्रss कर्रss वाजत आपल्या व्यक्तिमत्त्वाचा रुबाब वाढविणाऱ्या कोल्हापुरी चपलेचा बाजार काहीसा मंदावला आहे. काही वर्षापूर्वी कोल्हापुरी चपलांचा ट्रेड होता. आता काळ बदलला आणि कोल्हापुरी चप्पलेचा वापर देखील कमी झाला आहे. आता फक्त काही समारंभापुरतीच या चपलांचा वापर होत असतो. मात्र, या चपला बनवण्यामागे असलेला कारागीर आणि या कोल्हापुरी चपला टिकाव्या यासाठी मुंबईत आयटीची पॉश नोकरी सोडून परंपरा टिकून राहावी यासाठी युवा उद्योजक भूषण कांबळे झटत आहेत, याबाबत ई-टीव्ही भारताचा विशेष रिपार्ट..
भूषण कांबळे यांचे वडिलोपार्जित मुंबईतील वांद्रे-खार परिसरात साई वैभव फुटवेयर हे दुकान आहे. 1976 पासून त्यांच्या आजोबांनी सुरू केलेले हे दुकान आजतागायत सुरू आहे. या व्यवसायाकडे भूषण देखील वळला आहे. त्याला हा व्यवसाय जगभरात पसरवयाचा आहे. भुषणने कॉलेजचे शिक्षण आयटीमधून घेतल्यानंतर टीसीएस, विप्रोसारख्या नामांकित कंपन्यात त्याने काम केले. पण आपण वेगळ्या वाटेने जायचं आणि काहीतरी वेगळं करायचं, हे डोक्यात पक्क असलेल्या भुषणने नोकरी ठिकठाक सुरु असतानाही थोडीशी रिस्की आणि तितकाच आव्हानात्मक निर्णय घेतला. कोल्हापुरी चप्पल टिकवण्यासाठी त्यांनी नवनवीन प्रयोग करण्याचे ठरवले. कारागीर जगला पाहिजे, हे ध्येय समोर ठेवून त्याने नव्या जोमाने सुरुवात केली.
हे ही वाचा -ईटीव्ही विशेष : नवाब मलिक बनले महाविकास आघाडीचे 'हिरो'!
वहाण जगात इतकी पसरली आहे की, अनेकांची परदेशातूनही मागणी होत आहे. काहीजण वहाणच्या फ्रेंचाईसबद्दल विचारणा करतात. कोरोनाच्या काळात अनेक उद्योगधंदे बंद पडले. पण कोरोनाने गणित बिघडलं तरीही डगमगून न जाता भूषणने 150 कारागिरांना हाताला दिलेलं काम सुरूच ठेवलं. कारण एकच होतं ते म्हणजे लयाला जात असलेली कला आणि कारागीर जिवंत राहावा. भविष्यात मोठ्या ब्रँडला टक्कर द्यायची आहे, असेही भूषण सांगतात.