मुंबई - देशाची दुसरी खासगी ट्रेन असलेली मुंबई ते अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस (Tejas Express) उद्यापासून आठवड्याचे सहा दिवस धावणार आहे. पूर्वी तेजस एक्सप्रेस आठवड्यातून पाच दिवस धावत होती. मात्र, आता इंडियन रेल्वे टुरिझम अँड केटरिंग कार्पोरेशनने (आयआरसीटीसी) सहा दिवस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई ते गुजरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सहा दिवस धावणार तेजस एक्स्प्रेस- वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ट्रेन क्रमांक 82901/82902 मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस बंद करण्यात आली होती. कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर 7 ऑगस्ट 2021 पासून पुन्हा तेजस एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. मात्र प्रवासी कमी असल्याने शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार असे आठवड्यातील चार दिवस तेजस एक्स्प्रेस धावू लागली होती. 22 डिसेंबर 2021 पासून बुधवार जोडून आठवड्यातील 5 दिवस तेजस एक्स्प्रेस सुरू करण्यात आली होती. मात्र आता गुजरात आणि महाराष्ट्रातील कोरोना निर्बंध पूर्णपणे हटविण्यात आल्याने आयआरसीटीने मुंबई ते अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस आठवड्यातून सहा दिवस चालण्याचा निर्णय घेतलेला आहे.
प्रवाशांच्या सुविधेसाठी घेतला निर्णत- आयआरसीटीसी जनसंपर्क अधिकारी पिनाकिन मोरावाला यांनी सांगितले की, उन्हाळाचा सुट्या लक्ष्य घेता, प्रवासी संख्या वाढली आहे. त्यामुळे उद्यापासून ट्रेन क्रमांक 82901/82902 मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस आठवड्यातून सहा दिवस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी तेजस एक्स्प्रेस धावणार आहे. फक्त गुरुवारी तेजस एक्स्प्रेस बंद ठेवण्यात येणार आहेत.
मार्गदर्शक तत्त्वांचे पालन - राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून प्रवाशांना सेवा दिली जात आहे. यासह प्रवाशांच्या सुरक्षिततेबद्दल आणि आरोग्याबाबत योग्य काळजी घेतली जाते. सर्व प्रवाशांना प्रत्येक डब्यात रेल्वे होस्ट, उत्कृष्ट कॅटरिंग सेवा देण्यात येत आहे अशी माहिती जनसंपर्क अधिकारी पिनाकीन मोरावाला यांनी दिली आहे.