मुंबई - मध्य रेल्वे प्रशासनाकडून वेळोवेळी प्रवाशांच्या हितासाठी अनेक उपक्रम राबवले जातात. असाच एक उपक्रम मध्य रेल्वेने सुरू केला आहे, लांब पल्याच्या गाड्यांना उशीर झाल्यावर आपल्याला रेल्वे स्थानकावर ताटकळत उभे राहावे लागते, हीच बाब रेल्वे प्रशासनाने लक्षात घेत प्रवाशांसाठी एक सुसज्ज अशा विश्रांती गृहाची (वेटिंग रूम) उभारणी केली आहे. एखाद्या विमानतळावर ज्या प्रमाणे विश्रांती गृह असतात, तशाचप्रकारे याची उभारणी केली आहे.
रेल्वे स्थानकात लवकरच वातानुकूलित आणि सुसज्ज विश्रांती कक्ष (लक्झरी लाँज) सुरू करण्याची कल्पना एका खासगी एनएमआर कंपनीने रेल्वे मंडळाकडे मांडली होती. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रस्ताव रेल्वे मंडळाकडे प्रलंबित होता. मात्र, आता हे विश्रांती गृह लोकांच्या सेवेसाठी सुरू झाले आहे. सीएसटी येथून लांब पल्यांचा गाड्यांच्या विश्रांतीसाठी स्थानकात प्रतीक्षालय असतात, मात्र त्याठिकाणी योग्य सेवा नसल्याने त्यापेक्षा आता खासगी कंपनीने जे विश्रांती कक्ष बनवले आहेत. तो कक्ष आधुनिक व सर्वांना आवडणारा आहे. रेल्वेगाडीला विलंब असेल तर तिकीटधारकांच्या श्रेणीनुसार विश्रांती गृहांमध्ये थोडेशे पैसे मोजून सर्वसामान्यांना याचा उपयोग करता येणार आहे. या ठिकाणी उच्च श्रेणीतील तिकीटधारकांसाठी वातानुकूलित विश्रांती कक्ष, तर साध्या तिकीटधारकांसाठी साधी वेटिंग रूम आपल्याला हवे तसं आपण सेवा घेऊ शकतो. प्रवाशांमध्ये भेदभाव न करणारा विश्रांती कक्ष हा आता सीएसटी स्थानकात सुरू झाला आहे. या ठिकाणी रेल्वेचा वेळेचे स्क्रीनस, वायफाय, टीव्ही तसेच खाण्यापिण्याची व विश्रांतीची उत्तम सोय करण्यात आली आहे. रेल्वेने या उपक्रमासाठी एक ही रुपया खर्च केलेला नाही.
सीएसटी स्थानकात चांगला प्रतिसाद
असे अत्याधुनिक आणि उत्तम सोय देणारे वेटिंग रूम महाराष्ट्रात प्रथमच सीएसटी स्थानकात बनले आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद देखील याला मिळत आहे त्यामुळे असे आणखी चांगले वेटिंग रूम मुंबईत काही स्थानकात बनवले जातील अशी माहिती मध्य रेल्वे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे.