मुंबई - गणेशोत्सवाला कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्यास राज्य सरकारने शुक्रवारी परवानगी दिली. राज्य सरकारने मध्य रेल्वेला लिहिलेल्या पत्रामध्ये कोकणसाठी विशेष रेल्वेचे नियोजन करण्यास सांगितले. त्याचप्रमाणे मागणीनुसार गाड्या सोडतानाच कन्फर्म तिकीट आणि ई-पास असलेल्यांनाच यातून प्रवासाची मुभा देण्याच्या सूचना आहेत.
केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार रेल्वे प्रवासादरम्यान शारीरिक अंतर राखणे, सॅनिटाईज करणे बंधनकारक असणार आहे. नुकतीच राज्य सरकारने कोकणात जाण्यासाठी एसटीला परवानगी दिली. दरवर्षी एसटी व रेल्वेतर्फे विशेष गाड्या कोकणासाठी सोडल्या जातात. मात्र, यंदा लॉकडाऊनमुळे कोकणात जाण्यासाठीचा कोणताही ठोस निर्णय राज्य सरकार कडून घेण्यात आला नाही. म्हणून क्वारंटाइनच्या अटीमुळे आधीच मोठ्या संख्येने चाकरमानी खासगी गाड्यांनी कोकणात रवाना झालेत. याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांना विचारले असता, आम्ही लवकरच माहिती देऊ, असे त्यांनी सांगितले.