मुंबई - सध्या धनुष्यबाण बंडखोरांना मिळणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र धनुष्यबाण कोणीही हिरावू शकत नसल्याची स्पष्टोक्ती माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. कायदेतज्ज्ञांशी सल्ला घेतल्यानंतरच हे बोलत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मातोश्रीवर शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते.
आमदार पळून गेल्याने पक्ष संपत नसतो - शिवसेनेचे आमदार पळून गेले आहेत. मात्र आमदार पळून गेल्याने पक्ष संपत नसतो असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. विधीमंडळ पक्ष आणि रजिस्टर पक्ष यामध्ये फरक असतो. मात्र लोकांच्या मनात भ्रम निर्माण केल्या जात असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. शिवसेनेसोबत साधी माणसे आहेत. या माणसांची मातोश्रीवर रिघ लागली आहे. त्यांच्या भावना ते माझ्यापर्यंत पोहोचवत आहेत. मी देखील त्यांच्या अडचणी समजून घेत आहे. ही साधे माणसेच शिवसनेची ताकद आहे. त्यामुळे शिवसेना कधीच संपणार नसल्याचेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
सूरतला जाऊन बोलायची गरज नव्हती - आज अनेक आमदार मातोश्रीबद्दल आणि माझ्याबद्दल आदर असल्याचे सांगत आहेत. त्यातील काही आजही मातोश्रीवर परत यायला तयार असल्याचे सांगतात. मी तेव्हाही तुम्ही मातोश्रीवर येऊन बोला, आपण बोलून विषय संपवू असे सांगितल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. मात्र बंडखोर आमदार सूरतला गेले आणि तेथून बोला म्हणत होते. बंडखोरांना बोलायचेच होते तर त्यासाठी सूरतला जायचे नव्हते, मातोश्रीवर येऊन बोलायचे होते, असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केले.
लोकशाही किती काळ मजबूत राहणार हे ठरवणारा निकाल - यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, की धनुष्यबाण हा शिवसेनेचा आहे आणि तो शिवसेनेकडेच राहील. काही झाले तरी आम्ही, मागे हटणार नसल्याचेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. बारा तारखेला जो काही निकाल लागेल, तो लागेल. मात्र उद्याची केस देशात लोकशाही किती काळ मजबूत राहणार आहे, हे ठरवणारा हा निकाल असेल. हा निकाल काहीही असो मात्र देशाला दिशा दाखवणारा हा निकाल असणार असल्याचेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
तेव्हा दातखिळी बसली होती - शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर भाजपने एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरकार स्थापन केले. बंडखोरांना गुजरातला पळवल्यानंतर मोठमोठे आकडे बाहेर आले. मात्र अडीच वर्षापूर्वीच भाजपने हे केले असते, तर मोठा खर्च वाचला असता, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवरही हल्ला चढवला. मातोश्रीबद्दल बंडखोर आमदार आदर असल्याचे आता सांगत आहेत. मात्र जेव्हा मातोश्रीवर विरोधकांनी हल्लाबोल केला, माझ्या मुलाला जीवनातून उठवण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा या बंडखोरांची दातखिळी बसली होती, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी यावेळी केली. आता हेच बंडखोर आमच्यावर टीका करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लाऊन बसले आहेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
माझा न्याय देवतेवर विश्वास - शिवसेनेने बंडखोर आमदरांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर 12 तारखेला निर्णय होणार आहे. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला. देशात लोकशाही किती काळ टिकून राहील हे दर्शवणारा हा निकाल ठरेल असे ते म्हणाले. त्यामुळे या निकालाकडे सगळ्या देशाचे लक्ष लागल्याची माहितीही उद्धव ठाकरे यांनी दिली.
बंडखोरीबाबत मलाही वाईट वाटले - एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी केली. त्यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे यांनीही बंडखोरी झाल्यामुळे मलाीह वाईट वाटले. मी देखील माणूस आहे. त्यामुळे मलाही भावना आहेत. अशाप्रकारे बंडखोरी करणे चुकीचे असल्याचेही ठाकरे म्हणाले.
निवडणुका घ्या मग कळेल खरी शिवसेना कोणाची - "मातोश्रीने सन्माने बोलावले तर आम्ही जाऊ असे म्हणाले, त्यांच्यासाठी आजही प्रेम आहे, त्यासाठी धन्यवाद. गेली काही वर्ष तुम्ही आज ज्यांच्याकडे गेलात, ते ठाकरे कुटुंबियांबद्दल बोलले. तुम्ही त्यांच्या मांडीवर बसलात. अश्या लोकांच्या सोबत तुम्ही स्वागत स्वीकारत आहात. हे जनतेला कळू द्या. आज अनेक मुद्दे आहेत पण मी सगळे बोलणार नाही. काही दिवसात सर्वांशी चर्चा करुन निर्णय घेईल. अनेक अनोळखी व्यक्ती सोबत पाठिंबा दर्शवताहेत. विधानसभेची निवडणुक घ्या. आम्ही चूक असू तर शिक्षा मिळेल. तेव्हा मुख्यमंत्री पद दिले असते, तर हजारो कोटी खर्च करावे लागले नसते. माझ्याकडून वादविवाद नको. अडीच वर्ष आपल्यावर टीका होत असताना तुम्ही गप्प होतात. सगळ्यांना धन्यवाद, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
लवकरच पंढरपूरला जाणार - अनेक दिवसांनी तुमचे मातोश्रीत स्वागत आहे, सन्मानाने बोलावले, भविष्यात सुद्दा हीच अपेक्षा आहे. एक दोन दिवसांनी आषाढी एकादशी आहे. काही जण आज उद्याच दर्शन घेतील. मी नंतर जाऊन नक्कीच दर्शन घेईन असेही उद्धव ठाकरे म्हणाले. गेले ८-१० दिवस मातोश्रीला लोंढेच्या लोंढे येत आहेत. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रु आहेत, शिवसेनाप्रमुखांचे एक वाक्य आहे, माशांच्या डोळ्यातले अश्रु कुणाला दिसत नाहीत. दडपण नाही, हे सांगणे माझे काम आहे. काही दिवस अगोदर मी कोरोना पाॅझिटीव्ह होतो. मला कोविडनंतर जो त्रास झाला तो कुणालाही झाला नाही असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.