मुंबई : केंद्राने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात सध्या दिल्लीत आंदोलन सुरू आहे. या शेतकऱ्यांना खलिस्तानवादी आणि दहशतवादी म्हणणे हा देशातील प्रत्येक शेतकऱ्याचा अपमान आहे. या शेतकऱ्यांना दहशतवादी न म्हणता, पंतप्रधानांनी त्यांच्याशी चर्चा करायला हवी. कारण, हे शेतकरी आहेत, म्हणूनच देश आहे असे शिवसेना खासदार संजय राऊत आज म्हणाले.
पटेलांचा पुतळाही आंदोलन पाहून अश्रू ढाळत असेल..
सरदार पटेलांना भाजप सर्वोच्च स्थानी मानत. पटेल हे एक शेतकरी नेते होते, त्यामुळे शेतकऱ्यांसोबत आज जे होत आहे ते पाहून त्यांच्या मूर्तीमधूनही अश्रू येत असतील, असे राऊत म्हणाले. शेतकऱ्यांच्या विरोधात केंद्र सरकार पोलीस बळाचा वापर करत आहे, तोच वापर चीन आणि लडाखसाठी करायचा होता, असा टोलाही राऊतांनी केंद्र सरकारला लगावला आहे.
शेतकऱ्याला देशद्रोही म्हणणे दुर्दैवी..
ज्या शेतकऱ्यामुळे हा देश आहे, त्या शेतकऱ्यालाच दहशतवादी, खलिस्तानवादी म्हणणं अतिशय दुर्दैवी आहे. हे शेतकरी पंजाबचे आहेत म्हणून ते खलिस्तानवादी ठरणार का? उलट याच शेतकऱ्यांनी शांततेत आंदोलन करुन जगासमोर आदर्श उभारला आहे, असेही राऊत म्हणाले.
कानाला डोळ्याला त्रास व्हावा म्हणून माझी नियुक्ती..
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर सामना'च्या संपादक पदावर टीका केली होती त्याला प्रत्युत्तर देताना आज संजय राऊत म्हणाले की, तुमच्या कानाला-डोळ्याला त्रास व्हावा म्हणून उद्धव ठाकरेंनी संपादकपदी माझी नियुक्ती केली आहे.
ऊर्मिला मातोंडकर मूळच्या शिवसेनेच्या..
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेकडून राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी शिवसेनेने स्थान दिल्यानंतर, आता त्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. याबाबत बोलताना राऊत म्हणाले, की मातोंडकर या मूळच्या शिवसैनिकच आहेच. ऊर्मिला मातोंडकर उद्या (मंगळवार) शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. यामुळे आमची महिला आघाडी मजबूत होणार आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा : कोरोना लस विकसित करणाऱ्या तीन टीमसोबत पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे साधणार संवाद