मुंबई - मुंबईमध्ये दरवर्षी पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर रस्त्यांच्या दुरुस्ती तसेच नुतनीकरणाची काम केली जातात. यंदा पावसाळा जवळ आला तरी 268 रस्त्यांची कामे सुरू झालेली नाहीत. तसेच, मुंबईतील रस्त्यांवर गेल्या दोन वर्षांत फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे. यामुळे मुंबईकरांच्या समस्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे.
हेही वाचा - High Court observation : चुंबन हा प्रथमदर्शनी अनैसर्गिक सेक्स नाही; हायकोर्टाचे निरिक्षण
रस्त्यांची कामे - मुंबईत पावसाळा सुरू झाला की विविध ठिकाणी रस्ते खड्डेमय होतात. दरवर्षी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे मुंबईकर त्रस्त होतात. मुंबईत महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए, मुंबई पोर्ट ट्रस्ट, रेल्वे आदी विभागांचे रस्ते आहेत. मात्र, खड्डे आणि निकृष्ट रस्ते यावरून महापालिकेवर टीका केली जाते. पालिकेवर होणारी टीका बंद व्हावी म्हणून शहरातील सर्वच रस्ते कॉंक्रीटचे करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. गेले काही वर्षे टप्प्याटप्प्याने मुंबईतील रस्ते कॉंक्रीटचे केले जात आहेत. ज्या ठिकाणी रस्ते कॉंक्रीटचे करणे शक्य नाही अशा ठिकाणच्या रस्त्यांचे डांबरीकरण केले जात आहे.
801 रस्त्यांची कामे - महापालिकेने 2021 - 22 मध्ये 196 किलोमीटरचे रस्ते पूर्ण केले आहेत. त्यात 163.57 किलोमीटरचे सिमेंट काँक्रीटचे, तर 32.77 किलोमीटरच्या रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे. 2022 - 23 मध्ये रस्त्यांच्या कामासाठी 2 हजार 200 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सध्या 801 रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. त्यापैकी 475 कामे सुरू झाली असून, 268 रस्त्यांची कामे सुरू झालेली नाहीत.
कामे पूर्ण होणार - रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी दिड वर्षांचा कालावधी असतो. पावसाळ्यात ही कामे बंद असतात. यामुळे कामे कमी दिसत असली तरी ती ठरल्या वेळेत पूर्ण होतील, असा विश्वास पालिकेचे पायाभूत सुविधेचे उपायुक्त उल्हास महाले यांनी दिला.
मुंबईत फेरीवाले वाढले - मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या प्रसारादरम्यान लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. यामुळे अनेकांनी आपले व्यवसाय सुरू केले आहेत. मुंबई महापालिकेने फेरीवाल्यांच्या केलेल्या सर्व्हे दरम्यान 95 हजारांहून अधिक अर्ज आले होते. त्यापैकी केवळ 15 हजार अर्ज पात्र ठरले आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षांत ही संख्या वाढली आहे. पालिकेने अद्याप फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी केलेली नाही. फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करावी, फेरीवाला धोरणात नगरसेवकांचा समावेश करावा, अशा मागण्या आहेत. फेरिवाल्यांचा नव्याने सर्व्हे केला जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.