मुंबई- यावर्षी खरिपासाठी लागवडीखाली असलेले क्षेत्र एक कोटी 47 लक्ष हेक्टर एवढे आहे. त्यात 43 लाख हेक्टर मध्ये कापूस, तर 43 लाख हेक्टर सोयाबीन अशी पीकं घेतली जाणार आहेत. तर इतर क्षेत्रावर अन्य पिकांची लागवड करण्यात येणार आहे.
पावसाळा तोंडावर आला आहे. राज्यभरातील शेतकरी खरीप पिकांच्या तयारीला लागले आहेत. यावर्षी पाऊस मुबलक असल्याचा अनुमान हवामान खात्याने दिला असून वेळेवर मान्सूनचे आगमन होईल अशी आशा आहे. त्यामुळे बळीराजा कडून शेतीच्या मशागतीची काम जोराने सुरू झाली आहे. मात्र, शेतीसाठी लागणारी अवजारे, खत, बी-बियाणे याबाबतचे राज्य सरकारचे धोरण महत्त्वाचे असणार आहे. कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांना तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसला आहे. या परिस्थितीत राज्य सरकारची तयारी काय असणार, देखील तितकेच महत्त्वाचे असणार आहे.
यावर्षी खरिपासाठी लागवडीखाली एक कोटी 47 लक्ष हेक्टर क्षेत्र आहे. त्यात 43 लाख हेक्टर मध्ये कापूस, तर 43 लाख हेक्टर सोयाबीन अशी पीक घेतली जाणार आहेत. तर इतर क्षेत्रावर अन्य पिकांची लागवड करण्यात येणार आहे. खरीप पिकांच्या लागवडीसाठी एकूण 18 लाख क्विंटल एवढी बियाणांची गरज आहे. यासाठी 40 लाख मेट्रिक टन एवढी खतांची गरज आहे. केंद्राकडून 42 लाख मेट्रिक टन खतांच्या वाटपाची मान्यता देण्यात आली आहे. तर मागील हंगामातील चलन 21 लाख टन खत राज्याकडे शिल्लक आहे. आतापर्यंत दहा लाख क्विंटल बियाणांचे वाटप राज्य सरकार कडून करण्यात आले आहे. मे अखेरपर्यंत राज्य सरकारकडून एकूण खतांपैकी 81 टक्के खतांचे वाटप पूर्ण झाले, अशी माहिती राज्याच्या कृषी विभागाकडून दिली गेली आहे.
कोरोना काळात शेतीची कामे थांबणार नाही. याची दक्षता राज्य सरकारकडून घेण्यात आली आहे. शेतीसाठी लागणारी अवजारे, खते तसेच इतर साहित्याचे दुकान कोविडचे नियम पाळून सुरू राहतील, याची दक्षता राज्य सरकारकडून घेण्यात आली आहे. तसेच तौक्ते चक्रीवादळामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे, त्यासाठी राज्य सरकारकडून विशेष दराने निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. निसर्ग चक्रीवादळाचे पूर्ण निकष लावून या शेतकऱ्यांची मदत केली जाईल, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. खतांचा कुठेही तुटवडा जाणवणार नाही, याची दक्षता ही राज्य सरकारकडून घेण्यात येते आहे. अशा प्रकारची सगळी व्यवस्था राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. मात्र जेव्हा पेरणीची कामं सुरू होतील त्यानंतर राज्य सरकारची तयारी कितपत झाली हे स्पष्ट होईल.