मुंबई - २०१९ साली एनडीएमधून बाहेर पडलेली शिवसेना आता यूपीएमध्ये समाविष्ट होण्याच्या मार्गावर आहे. एकीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी जवळीक साधणारी शिवसेना आता ममता बॅनर्जी यांच्या मना विरोधात यूपीएत समाविष्ट होऊन दुहेरी भूमिका निभावताना दिसणार आहे. तसेच, लोकसभेत १९ व राज्यसभेत ३ खासदार असणाऱ्या शिवसेनेचा काँग्रेसलासुद्धा फायदाच होणार आहे.
हेही वाचा - Anil Deshmukh Case : अनिल देशमुखांच्या दोन्ही स्वीय साहाय्यकांचा जामीन अर्ज पीएमएल न्यायालयाने फेटाळला
ममता बॅनर्जी यांच्या मना विरोधात शिवसेना यूपीएमध्ये?
मागच्याच आठवड्यात मुंबई दौऱ्यावर आलेल्या तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर युपीए कुठे आहे? असे सांगत काँग्रेस नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी ममता बॅनर्जींवर टीका करत प्रतिक्रिया सुद्धा दिल्या होत्या.
महाराष्ट्रात २ वर्षांपूर्वी महाविकास आघाडीच्या प्रयोगाद्वारे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापन केली. तिन्ही पक्षात अंतर्गत धुसफूस असली तरीसुद्धा २ वर्षांचा कार्यकाल महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रात पूर्ण केला. राज्यात भाजप पक्ष हा सर्वाधिक १०५ आमदार असलेला पक्ष असला तरी त्याला विरोधात बसवणे या तिन्ही पक्षांच्या एकजुटीने दाखवून दिले. देशात भाजप विरोधात एकजूट करायची असेल तर, काँग्रेस पक्षाला डावलून चालणार नाही, हे शिवसेनेला किंबहुना याबद्दल संजय राऊत यांनी उघडपणे सांगितलेले आहे. आणि म्हणूनच संजय राऊत यांनी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली व उद्या ते काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांची भेट घेणार आहेत.
उत्तर प्रदेश व गोवा निवडणुकीत फायद्याची शक्यता?
शिवसेना २०१९ मध्ये एनडीएतून बाहेर पडली. अद्याप शिवसेना यूपीएचा घटक पक्ष नाही. पण, सध्या राज्यात किंबहुना देशात जी परिस्थिती निर्माण होत आहे त्यानुसार शिवसेनेला सोबत घेणे हे काँग्रेसला सुद्धा हिताचे ठरणार आहे. विशेष करून उत्तर प्रदेश व गोव्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी. पुढल्या वर्षी २०२२ मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना यूपीएमध्ये सहभागी होण्याची शक्यता वाढली आहे.
शिवसेना यूपीएत सहभागी होण्याच्या हालचाली वाढल्या
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी यूपीएवरून काँग्रेसवर निशाणा साधला होता. ममता बॅनर्जींनी यूपीए आणि काँग्रेस संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी भाजपला सत्तेतून घालवायचे असल्यास काँग्रेसची भूमिका महत्त्वाची असल्याचे नमूद केले होते. आता त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना यूपीएत सहभागी होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यामुळे शिवसेना आणि काँग्रेसमधील जवळीक वाढताना दिसत आहे.
महाविकास आघाडी स्थापन करून महाराष्ट्रात सत्ता स्थापन करताना शिवसेना एनडीएमधून बाहेर पडली होती. तेव्हा शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून शिवेसना राष्ट्रीय पातळीवरील कोणत्याही आघाडीमध्ये सहभागी झाली नव्हती. परंतु, राष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवायची असेल तर, राष्ट्रीय स्तरावर सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसबरोबर संबंध तोडणे किंवा त्यांना दूर ठेवणे, हे शिवसेनेला घातक ठरू शकते. त्याचबरोबर, राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तेत बसलेल्या शिवसेनेला सध्याच्या परिस्थितीनुसार उद्याच्या घडीला दिल्लीतील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी जवळीक असणे केव्हाही फायदेशीर ठरू शकते, हे सुद्धा माहिती आहे. आणि म्हणूनच ममता बॅनर्जी यांचे मन जरी या कारणाने दुखावले गेले तरीसुद्धा काँग्रेसला दुखावून चालणार नाही, हे सुद्धा शिवसेनेला माहीत आहे. म्हणूनच शिवसेना यूपीएत सहभागी होऊन जास्तीत जास्त घटक पक्षांना यूपीएमध्ये समाविष्ट करण्याच्या तयारीत सुद्धा दिसत आहे.
हेही वाचा - एमपीएससीला मराठा क्रांती ठोक मोर्चाची 'ही' मागणी, अन्यथा कार्यालयावर धडकण्याचा इशारा