मुंबई - बेस्ट उपक्रमाकडून चांगल्या व वातानुकिलत बसेस चालवल्या जात आहेत. तसेच, भाडेही कमी असल्याने प्रवाशांकडून बेस्टला प्राधान्य दिले जात आहे. प्रवाशांना आणखी चांगली सुविधा देण्यासाठी जुन्या बसेसच्या बदल्यात एसी आणि पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक बसेस ( Best Electric Bus ) चालवल्या जात आहेत. बेस्टच्या ताफ्यात लवकरच २१०० बसेस येऊ घातल्या होत्या. मात्र, इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट रखडल्याने आता पुढील सहा महिने बेस्टच्या ताफ्यात नव्या बसेस उपलब्ध होणार नाहीत, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निविदा प्रक्रिया नव्याने राबवावी लागणार - बेस्टकडून पर्यावरणाच्यादृष्टीने इलेक्ट्रिक बसेस खरेदीवर भर दिला आहे. बेस्ट समितीने इलेक्ट्रा कंपनीला बसचे कंत्राट देण्यासाठी विरोध केला होता. पण, प्रशासनाने परस्पर निविदा प्रक्रिया काढत हे कंत्राट इलेक्ट्रा कंपनीला दिले. या निर्णयाविरोधात टाटा मोटर्सने हायकोर्टात धाव घेतली. मात्र, या प्रकरणात हायकोर्टाचा निकाल आल्याने ही संपूर्ण निविदा प्रक्रिया नव्याने राबवावी लागणार आहे. त्यामुळे पुढील सहा महिने नवीन बसेस ताफ्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले. वर्ष अखेरीपर्यंत मुंबईत ५०० इलेक्ट्रिक बसेस दाखल होणे अपेक्षित होते. परंतु, आता निविदा प्रक्रियाच हायकोर्टाने नव्याने घेण्याचे आदेश दिल्याने या बसेसची खरेदी सहा महिने लटकण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्याने निविदा प्रक्रिया होऊन बसेस उपलब्ध होण्यासाठी पुढचे वर्ष उजाडेल, अशीच स्थिती सध्याची आहे.
बेस्टच्या ताफ्यात इतक्या बसेस - बेस्ट उपक्रमाकडे एकूण ३६२७ बसेस आहेत. त्यामध्ये १८५४ बसेस या बेस्टच्या मालकीच्या आहेत. तर, १७९३ बसेस या भाडे तत्वावर ताफ्यात आहेत. सध्याच्या बसेसच्या उपलब्धततेनुसार अवघ्या ५० अशोक लेलॅण्ड कंपनीच्या बसेस बेस्टच्या ताफ्यात दाखल होतील. तर, सध्याच्या बेस्टच्या ताफ्यातील १८५४ बसेसपैकी ३०० बसेस स्क्रॅपसाठी जातील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. भाडेतत्वावरील बसेसमध्ये ३४० बसेस या टाटा मोटर्सने पुरवलेल्या आहेत. तर ४० बसेसचा पुरवठा हा इतर कंपन्यांकडून करण्यात आला आहे.
विरोधानंतरही निविदा प्रक्रिया - निविदा प्रक्रियेत इलेक्ट्रा कंपनीला बेस्ट प्रशासनाने बस पुरवठ्याचे कंत्राट दिले. बेस्ट समितीने याला विरोध केला होता. सत्ताधारी पक्षाचाही विरोध असताना बेस्ट प्रशासनाने हा मनमानी कारभार केला. मात्र, याचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना बसणार आहे, अशी प्रतिक्रिया माजी बेस्ट समिती सदस्य सुनिल गणाचार्य यांनी दिली आहे.
बेस्टच्या ताफ्यातील बसेस -
बेस्टच्या मालकीच्या बसेस - १८५४
भाडेतत्वावरील बसेस - १७९३
एकूण बसेस - ३६२७
हेही वाचा - Boy Died In Mumbai : छत्री सोबत खेळणे पाच वर्षीय मुलाला पडले महागात; अकराव्या मजल्यावरुन पडून मृत्यू