मुंबई : उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महाविकास आघाडीसह विरोधी भाजपकडूनही मोर्चेबांधणी केली जात आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज भाजप आणि महाविकास आघाडीच्या महत्वपूर्ण बैठका होणार आहेत.
सरकारला घेरण्याची रणनिती ठरविणार
भाजपची आज महत्वपूर्ण बैठक मुंबईत होणार आहे. अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठीच्या रणनितीवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. पूजा चव्हाण मृत्यु प्रकरणावरून भाजपकडून राज्य सरकारला सातत्यानं धारेवर धरलं जात आहे. या प्रकरणी वनमंत्री संजय राठोडांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून केली जात आहे. याशिवाय राज्यातील वाढत्या कोरोना प्रसारावरूनही सरकारला धारेवर धरण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. या अनुषंगाने या बैठकीत चर्चा होण्याचा अंदाज असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
महाविकास आघाडीचीही बैठक
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांचीही महत्वाची बैठक आज होणार आहे. पूजा चव्हाण मृत्यु प्रकरण, वाढता कोरोना प्रसार तसेच इतर मुद्द्यांवरून सातत्याने लक्ष्य करणाऱ्या विरोधकांचा सामना कसा करायचा यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते आहे. याशिवाय इतरही मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होण्याचा अंदाज आहे.
मुख्यमंत्र्यांचे आजचे कार्यक्रम
दुपारी 4.00 वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे मराठा आरक्षणाबाबत बैठक
सायंकाळी 5.30 वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे अर्थसंकल्पीय अधिवेशनपूर्व मंत्रिमंडळ बैठक
सायंकाळी 6.30 वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद