मुंबई - बंगालमध्ये पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसची सत्ता आल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे. निवडणूक निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या, त्यांच्या घरांवर हल्ला, घरांना आग लावणे लूटमारीच्या अनेक घटना घडत असल्याचा दावा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे हिंसाचाराच्या घटनेवर मुग गिळून गप्प का आहेत?, अशा शब्दात दरेकरांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पश्चिम बंगालमधील हिंसाचारावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले, की विचारांची लढाई विचारांनी लढली जावी, तिथे हिंसाचारास थारा नसावा! निवडणुकीनंतर बंगालमध्ये सुरू असलेला हिंसाचार अतिशय निंदनीय असून, हे थांबले पाहिजे! बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे, हिंसाचाराच्या घटनेवर मुग गिळून गप्प आहेत! अशा घटनांचे समर्थन होऊ शकते का?’ असा सवाल दरेकर यांनी केला आहे. त्याचबरोबर ‘बंगालमध्ये भाजपकडे गमावण्यासारखं काहीही नव्हतं! आज जेवढे आमदार निवडून आले आहेत, त्यामागे स्थानिक कार्यकर्त्यांचे समर्पन आहे. बंगालमध्ये वाढलेल्या जागा व मतांची वाढलेली टक्केवारी ही कार्यकर्त्यांना समर्पित आहे. परंतु ही हिंसा थांबली पाहिजे! जय श्रीराम!’ असे ट्विटही दरेकर यांनी केले आहे.
हेही वाचा-सेंट्रल व्हिस्टाचे काम थांबवा; दिल्ली उच्च न्यायालयात याचिका
उद्धव ठाकरेंकडून ममता बॅनर्जींचा वाघिणी म्हणून उल्लेख-
ममता बॅनर्जी या बंगाली जनतेच्या स्वाभिमानाचा लढा एकाकी लढत होत्या. त्यांच्या हिमतीला दाद द्यावीच लागेल. अखेर त्यांचा विजय झालाच आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय बंगालच्या या वाघिणीलाच द्यावे लागेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती.
हेही वाचा-दूध उत्पादक शेतकरी संकटात; लिटरमागे 5 रुपयांचा तोटा
भाजपाध्यक्ष जे पी नड्डा कोलकातामध्ये दाखल
दरम्यान, बंगाल हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा मंगळवारी कोलकाता येथे पोहोचले आहेत. हिंसाचाराबाबत चिंता व्यक्त करताना भाजप लोकशाही पद्धतीनेच तृणमूल काँग्रेसच्या अराजकतेचा सामना करेल आणि भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू व्यर्थ जाणार नाही, अशा शब्दात त्यांनी हिंसाचाराचा निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी भाजपचे केंद्रीय प्रभारी कैलास विजयवर्गीय, प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष, केंद्रीय सह प्रभारी शिवप्रकाश, माजी अध्यक्ष राहुल सिन्हा आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉयसह राज्यातील अन्य नेत्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर जे. पी. नड्डा भाजप कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी रवाना झाले.