मुंबई - विधानपरिषदेवर नियुक्ती करण्यासाठी 12 उमेदवारांची यादी राज्यपालांना देण्यात आली होती. परंतु यावर निर्णय घ्यायला राज्यपाल विलंब करत असताना या 12 उमेदवारांच्या यादीवर राज्यपालांनी काय विचार केला, असा प्रश्न विचारणारे पत्र राज्य सरकारतर्फे राज्यपालांना देण्याची शक्यता आहे. तसेच एक मार्चपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाआधी राज्यपालांनी 12 सदस्य संदर्भात निर्णय घ्यावा, अशी विनंती या पत्रातून केली जाणार आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत झाली चर्चा -
काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यपालांना दिलेल्या 12 उमेदवारांच्या यादी संदर्भात चर्चा झाली. तसेच बैठक झाल्यानंतरही मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यातही याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राज्यपालांना याबाबत विचारणा करणारे पत्र दिले जाऊ शकते का, याची चाचपणी राज्याचे महाधिवक्ता यांच्याकडून करण्यात येत आहे. महाविकास आघाडीकडून विधानपरिषदेच्या 12 उमेदवांसदर्भात दिलेल्या यादीवर राज्यपालांनी अद्याप सही न केल्याने तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, राज्यपाल संविधानिक पद्धतीने वागत नसतील, तर आम्हाला नाईलाजास्तव कोर्टात जावे लागेल, असा इशारा महाविकास आघाडीकडून देण्यात आला होता. त्यामुळे आता राज्याचे महाधिवक्तांकडून राज्यपालांना आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात पत्र दिले जाऊ शकते का, या संदर्भातील चाचपणी करण्यास सुरवात झाली.