मुंबई- मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील कुर्ला-टिळकनगर दरम्यान ओव्हर हेड वायरमध्ये बिघाड झाल्याने वडाळा-मानखुर्द लोकल सेवा ठप्प झाली होती. आधीच मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने हार्बर मार्गावर आज (रविवारी) सकाळी 11 च्या सुमारास ब्लॉक घेण्याचे नियोजन होते. त्यातच हा बिघाड झाल्यामुळे प्रवाशांचे मोठा प्रमाणात हाल झाले आहे.
लोकल सेवा ठप्प -
देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मध्य रेल्वेने हार्बर मार्गावरील सकाळी १०.५५ ते दुपारी ४.३० वाजपर्यंत मेगा ब्लॉक जाहीर केला होता. मात्र हा ब्लॅाक कुर्ला ते वाशी स्थानकादरम्यान असल्याने किमान कुर्ला ते सीएसएमटीपर्यंतच्या प्रवाशांना व्यवस्थित प्रवास करता येईल, अशी अपेक्षा होती. मात्र या ब्लॉकअंतर्गत काम सुरू होण्याआधीच सकाळी 7.50 वाजता, कुर्ला - टिळकनगर दरम्यान लोकलचा पेंटाग्राफ ओव्हर हेड वायरला अडकल्याने बिघाड झाला. त्यामुळे छत्रपती शिवाजी टमिर्नसकडे जाणाऱ्या लोकल सेवा विस्कळीत झाले होते. मेगाब्लॉक असल्याने हार्बर या मार्गावरील प्रवाशांनी घरातून लवकर निघून इच्छितस्थळी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तांत्रिक बिघाड झाल्याने घरातून लवकर निघून सुद्धा प्रवाशांना इच्छित स्थळी पोहचण्यास उशीर झाला. कुर्ला-टिळकनगर दरम्यान ओव्हर हेड वायरमध्ये बिघाड झाल्याने वडाळा-मानखुर्द लोकल सेवा ठप्प करण्यात आली होती.
प्रवाशांना लेटमार्क -
या बिघाडामुळे हार्बर मार्गावरील वडाळा ते मानखुर्द लोकल सर्व सुरक्षेच्या कारणास्तव बंद केली. यावेळी सीएसएमटी - वडाळा, वडाळा ते गोरेगाव, पनवेल - मानखुर्द लोकल सेवा सुरू होती. तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. त्यानंतर तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी काम सुरु केले. तब्बल 3.30 तासाने काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर सकाळी 11.30 वाजता लोकल सेवा सुरू केली. मात्र, बिघाडामुळे प्रवाशांना लेट मार्क लागलेला आहे.
हेही वाचा - तुळजापुरात मराठा क्रांती मोर्चाची बैठक, राज्यव्यापी बैठकीत ठरावाबाबत घेणार निर्णय