मुंबई - राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी ८ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्स समितीची बैठक बोलावली आहे. कोरोनाच्या स्थितीचा या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. दरम्यान, नंबर ऑफ टेस्ट वाढवण्याच्या (Corona Testing) सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली आहे. तसेच मास्क सक्तीबाबतचा निर्णय अद्याप घेतला नसून, मास्क घालण्याचे आवाहन टोपे यांनी जनतेला केले आहे.
राज्यात जवळपास दीड हजारांच्या आसपास नवीन रुग्ण संख्या आहे. रुग्ण संख्या वाढू लागल्याने राज्य सरकार अलर्ट मोडवर आले आहे. त्रिसूत्री नियमांचे पालन करण्याच्या सूचना वारंवार केल्या जातात. आज मंत्रिमंडळ बैठकीत मास्क सक्तीच्या संदर्भात चर्चा झाली असून, त्यावर एकमत झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समितीच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. राज्य आरोग्य विभागाचे अधिकारी, मुख्य सचिव मुंबई महापालिकेसह इतर पालिका, जिल्हा पातळीवरील अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कोरोनाबाबत पुन्हा निर्बंध लावणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मास्क सक्तीबाबत अद्याप निर्णय नाही - मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबई या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात टेस्टिंग वाढवणार आहोत. नंबर ऑफ टेस्ट वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आजपासून राज्यभरात टेस्टिंग वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सहा जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट जास्त झाल्याचे आढळले आहे. एकूण रुग्णांपैकी चार टक्के रुग्ण ॲडमिट होत आहेत. मास्क घालण्याचे आवाहन जनतेला करत आहोत. मात्र, अद्याप सक्तीबाबत अद्याप निर्णय नसल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दिंडीबाबतीत चर्चा झाली आहे. करण जोहरच्या घरी झालेल्या पार्टीत मोठ्या संख्येने कलाकार पॉझिटिव्ह आले आहेत. मंत्रिमंडळातील काही सहकारी पॉझिटिव्ह झाले आहेत. सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. बूस्टर डोसे घेण्यात यावा, असे आवाहन आम्ही करत आहोत. दिंडीत दहा-पंधरा लाख लोक एकत्र जमणार आहेत. त्यामुळे काळजी घेतली पाहिजे, असेही टोपे यावेळी म्हणाले.