मुंबई : ड्रिम्स मॉलचे प्रशासक राहुल सहस्त्रबुद्धेंना अटक करणार नाही, अशी ग्वाही मुंबई पोलिसांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली. राहुल सहस्त्रबुद्धे हे एनसीएलटीने ड्रिम्स मॉल चालविण्यासाठी नेमलेले प्रशासक आहेत. ड्रिम्स मॉलमधील सनराईज रुग्णालयाला लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाल्यानंतर राहुल सहस्त्रबुद्धेंचे नाव चर्चेत आले होते.
तोपर्यंत अटक नाही
पोलिसांना कोणतीही कारवाई करू नये असे निर्देश देण्याच्या विनंतीसह सहस्त्रबुद्धेंनी गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मंगळवारी अतिरिक्त सरकारी वकील अरुणा कामत पै यांनी न्यायमूर्ती शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पिटले यांच्या खंडपीठाला सांगितले की, पोलिसांनी 26 मार्च रोजी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये अद्याप सहस्त्रबुद्धेंचे नाव घेतलेले नाही. सहस्त्रबुद्धे यांचे वकील जे एस किन्नी यांनी कोर्टाला सांगितले की, आपल्या अशिलाला पोलिसांकडून हजर राहायला सांगणारे पत्र आले आहे. याप्रकरणी आता 8 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत पोलीस याचिकाकर्त्याला अटक करणार नाही, असे आश्वासन पै यांनी कोर्टाला दिले. कोर्ट आता याप्रकरणी 8 एप्रिल रोजी सुनावणी घेणार आहे.
सनराईज रुग्णालयात 25 मार्च रोजी अग्नितांडव
25 मार्च रोजी मुंबईच्या उपनगरी भागात भांडूप येथे असलेल्या ड्रिम्स मॉलच्या चौथ्या मजल्यावरील सनराईज रुग्णालयात भीषण आग लागली आणि 11 रूग्णांचा मृत्यू झाला होता. घटनेच्या दुसर्याच दिवशी पोलिसांनी सनराईज हॉस्पिटल चालाविणाऱ्या ड्रिम्स मॉलच्या मालक आणि प्रिविलेज हेल्थकेयर सर्विसेज प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांविरोधात एफआयआर दाखल केला.
हेही वाचा - मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार - गृहमंत्री वळसे पाटील