मुंबई - एनडीएला राज्यात ४५ तर देशात ३०० हून अधिक जागा मिळतील आणि पुन्हा एकदा एनडीएचे सरकार देशात स्थापन होईल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला. तसेच राज्यात मागील लोकसभा निवडणुकीत भाजपच्या येथील 42 जागा मिळाल्या होत्या, त्यात एकही जागा कमी होणार नाहीत, उलट त्यामध्ये वाढ होऊन आम्हाला राज्यात 45 पर्यंत जागा मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दानवे म्हणाले, राज्यात आम्हाला 45 जागा मिळतील आणि देशात आम्ही 300 हून अधिक जागा मिळवू, विरोधक यावेळी मोठ्या प्रमाणात अपयशी ठरले आहेत. ते या अपयशाचे कारण शोधत आहेत, यावेळी आम्ही विकासाचे मुद्दे घेऊन निवडणूक लढवली. त्यामुळे लोकांनी आम्हाला स्वीकारले असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. आम्ही विकासावर फोकस करत असताना विरोधक आम्हाला शिव्याशाप देत होते. मात्र त्यांना यश आले नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपच्या विरोधात केलेल्या प्रचाराच्या संदर्भात दानवे यांना विचारले असता ते म्हणाले की, राज ठाकरे यांच्या बोलण्यावर लोक फिदा होत असले तरी त्यातून मते मिळणार नाहीत. गेल्यावेळी आमच्या उमेदवारांच्या विरोधात मनसेने लोकसभेला राज्यात उमेदवार उभे केले होते, त्यांना किती मते पडली, असा सवाल करत आम्ही विधानसभेतही सेनेसोबत असणार आहोत, अशी माहिती दिली.
ज्या प्रकारे लोकांनी आम्हाला विश्वास दाखवला तो एक्झिट पोलमधून दिसत आहे. आम्ही देशात तीनशेचा आकडा पार करू आणि देशात एनडीएचेच सरकार असेल, असा विश्वासही दानवे यांनी व्यक्त केला.