मुंबई - राज्याच्या राजकारणात 15 वर्ष सत्ताधारी म्हणून राहिलेल्या राष्ट्रवादी पक्षाने, 2019 विधानसभा निवडणुकीच्या मैदानात लवकरच उडी घेतली. किंबहूना पक्षाची झालेली पडझड पाहता राजकारणातील आपले स्थान टिकवण्यासाठी आणि राजकीय क्षितीजावर कायम राहण्यासाठी राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक अतिशय महत्वाची असणार आहे., यासाठीच आपल्या तब्येतीचा अधिक विचार न करता स्वतः जन्माला घातलेल्या आपल्या पक्षाला जिवंत ठेवण्यासाठी शरद पवार वयाच्या 79 व्या वर्षी देखील मैदानात उतरले आहेत.
हेही वाचा... ...अशी ही साताऱ्याची तऱ्हा! आता तरी मनोमिलन होणार का?
राष्ट्रवादीचे दुसऱ्या फळीतले नेते गप्पच ?
राज्यात विधानसभेचे वारे जोराने वाहत आहेत. शिवसेना आणि भाजप हे सत्ताधारी पक्ष एकीकडे दिवस रात्र एक करून प्रचार करत आहेत, त्याच वेळी राष्ट्रवादी मात्र त्या जोशात वावरताना दिसत नाही. शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून सुरूवात जरी केली असली, तरी त्यात पक्षाचा सर्व नेते एकजूटीने सक्रिय झालेले दिसले नाही. अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, सुनिल तटकरे, धनजंय मुंडे यांच्याकडे पक्षाचे भविष्यातील नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे. परंतु पक्षाच्या अडचणी काळात मात्र त्यांची उपयोगिता पवारांच्या मानाने अतिशय कमी असल्याची जाणवत आहे. यामुळे पक्षाला उभारी देण्याच्या बाबतीत पवार एकटे पडताना दिसत आहे.
पवार स्वतः राज्यभर दौरे करत आहेत. कार्यकर्त्यांसोबत संवाद साधत आहेत. पायाला भिंगरी बांधुन पक्षाची प्रचाराची धुरा त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. नाराज नेते कार्यकर्ते यांची नाराजी दूर करणे, तिकीट वाटपाचे निर्णय, असे बहुतांशी निर्णयाची जबाबदारी पवारांच्याच शिरावार असल्याचे जाणवते.
हेही वाचा... 'शरद पवारांनी राष्ट्रविरोधी वक्तव्य करणे हे दुर्दैवी'
राष्ट्रवादीत दुसऱ्या फळीतील नेत्यांची मोठी फौज आहे, परंतु प्रचाराच्या बाबतीत त्यांचा उत्साह हा पवारांपेक्षा किती तरी कमी असलेला पाहायला मिळत आहे. यामुळे विरोधकांनाही शरद पवार एकटेच तोंड देताना दिसतात. त्यामुळे समोर विरोधी पक्षाचे तगडे आव्हान पाहता, पक्षाच्या इतर नेत्यांची हवी तशी साथ मिळत नसल्याने पवारांना एकटेच लढावे लागत आहे.
नेत्यांच्या गर्दीतही पवार एकटेच?
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून इतर अनेक पक्षातील नेते पवारांवर निष्ठा दाखवून पक्षात आले. त्यामुळे राष्ट्रवादीत नेतृत्वाची एक मोठी फळी पहिल्यापासूनच तयार होत आली. परंतु या वर्षी झालेल्या गळतीत अनेक लहान मोठे नेते पक्षाला सोडून गेले. यात स्थापनेपासून पक्षासोबत असलेले पद्मसिंह पाटील, मधुकर पिचड, विजयसिंह मोहिते यांसारखे पवारांवर निष्ठा दाखवणारे जवळचे होते, तर राणा जगजितसिंह पाटील, जयदत्त क्षीरसागर, उदयनराजे भोसले, गणेश नाईक, शिवेंद्र राजे, मदन भोसले, भास्कर जाधव, धनंजय महाडिक अशा अनेक नेत्यांनी ऐन निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला राम राम ठोकला.
हेही वाचा... 'राजकारणातलं युवा पर्व; मात्र घराणेशाहीतलेच सर्व', सामान्य कार्यकर्ता अद्यापही वंचितच
एवढ्या मोठ्या आऊट गोइंगनंतरही पक्षांत नेत्यांची उणीव नव्हती कारण ज्यांना पक्षाची दुसरी फळी म्हणावी अशी, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, धनजंय मुंडे, सुनिल तटकरे, राजन पाटील, छगन भुजबळ, नवाब मलिक, हसन मुश्रीफ, राजेश टोपे, अमोल कोल्हे यांसारखे अनेक दिग्गज नेते अजूनही पक्षात आहेत. तरिही पक्षाची प्रतिमा जपण्याची आणि कार्यकर्त्यांचा विश्वास वृद्धिंगत करण्याची जबाबदारी एकट्या शरद पवारांवर असलेली दिसते... यामुळेच पक्षांतील नेत्यांच्या भाऊगर्दीत शरद पवार एकटेच असल्याचे, दिसत आहे.
हेही वाचा... अशोक चव्हाणांना विरोधक पकडणार कोंडीत...भोकरमधील भाजपच्या हालचाली वाढल्या
पवारांना निवडणुकांचे आव्हान एकटेच पेलावे लागणार ?
राज्याच्या विधानसभा निवडणूकीला आता काही मोजकाच कालावधी बाकी आहे. राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष म्हणून निवडणूकीला सामोरे जाण्यासाठी राष्ट्रवादी सर्व ताकद लावण्याचा प्रयत्न करत आहेत. मागील काही दिवसात पक्षातील मोठ्या संक्रमणामुळे या वेळी पक्षापुढे असलेले आव्हान अधिक मोठे आहे. त्यामुळे आता पक्षाच्या नेत्यांची, भांबावलेल्या कार्यकर्त्यांची मोट बांधण्याची धुरा आपल्या वयाने थकलेल्या खांद्यावर शरद पवारांनी स्वतःच्या घेतली आहे. त्यांनी सोलापुरपासून आपल्या प्रचाराला सुरूवात करतच 'अजून आपण म्हातारे झालो नाहीत' हा विश्वास स्वतःला आणि कार्यकर्त्यांना दाखवत आपल्या या लढाईला सुरूवात केली आहे. परंतु पक्षातील इतर नेत्यांची त्यांना हवी तशी साथ मिळत नसल्याने पवार साहेब! तुम्ही एकटे तरी किती लढणार...?, अशी आर्त साद कार्यकर्ते पवारांना करत आहेत.