मुंबई - राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक हे अमली पदार्थ विरोधी पथकाचे विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांच्या विरोधात अनेक आरोप करत आहेत. यातच त्यांनी आज पुन्हा एकदा नवीन ट्विट करत या आरोपांमध्ये भर टाकली. नवाब मलिक यांनी आज नवीन ट्विट करत समीर वानखडे यांच्या पहिल्या लग्नाचा फोटो त्यांनी ट्विट केला आहे. यासोबतच समीर वानखेडे आणि शबाना कुरेशी यांच्या लग्नाचा निकाहनामा असल्याचाही त्यांनी ट्विट करत दावा केला आहे. या निकाहनामा मध्ये समीर दाऊत वानखडे अशा नावाचा उल्लेख आहे. हे लग्न 6 डिसेंबर 2008 साली झाला असल्याचंही नवाब मलिक यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितला आहे.
समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखडे यांनी धर्मपरिवर्तन केलं होतं. मात्र धर्मपरिवर्तन करूनही समीर वानखेडे यांनी खोटी कागदपत्र दाखल करून नोकरी मिळवली असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांच्यावर केला आहे. शिवाय आपण कोणत्याही धर्माचं राजकारण करत नसून वानखेडे यांनी ज्यापद्धतीने खोटे प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवली आणि मागासवर्गींयाच्या नोकरीवर गदा आणली, हे पुढे आणत असल्याचे देखील म्हणाले.
मलिक यांनी घेतली गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची भेट
मंत्री नवाब मलिक यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपाबाबत चर्चा केली आहे. एनसीबी कडून कशाप्रकारे खोट्या तक्रारी दाखल करण्यात येतात आणि त्या खोट्या तक्रारी दाखल केल्या नंतर खंडणी वसूल केली जाते. याबाबत नवाब मलिक सातत्याने आरोप करत आहेत. या आरोपांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सोबत नवाब मलिक यांनी चर्चा केली असून याबाबत लवकरच गुन्हा दाखल करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती नवाब मलिक यांनी भेटीनंतर दिली. एन सी बी ची कारवाई आणि विभागीय आयुक्त यांच्या कारभारावर आपण प्रश्न उपस्थित केले होते. कार्डिया क्रूज वर एनसीबीने कारवाई केली. या कारवाईत पंच असलेल्या प्रभाकर साईलने एनसीबीवर 25 कोटी रुपये खंडणी मागितली असल्याचा आरोप केल्याने नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपात अजूनच भर पडली आहे. त्यामुळे या प्रकरणात एसआयटी द्वारे चौकशी केली जावी अशी मागणी गृहमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.