मुंबई - केंद्र सरकारने कंगना रणौतला दिलेला पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा. कंगना यांना अमली पदार्थाचा डोस जास्त झाल्याने, त्या अशी वक्तव्य करत असल्याचा टोला राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे. कंगना यांनी केलेल्या वक्तव्यामुळे स्वातंत्र्यसैनिक तसेच सीमेवर लढणाऱ्या जवानांचा अपमान झाला आहे. गांधीजीपासून सर्वच स्वातंत्र्यसेनानी यांचा हा अपमान करण्यात आला असून, कठोर शब्दात कंगना रणौत यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो असंही प्रसारमाध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांनी म्हटले.
तसेच केंद्र सरकारने कंगना रणौतला दिलेला पद्मश्री पुरस्कार लवकरात लवकर परत घ्यावा आणि त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे स्वातंत्रसेनानीचा अपमान झाला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देखील नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.
कंगना काय म्हणाली होती?
एका मुलाखतीत कंगना रणौत हिनं स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एका प्रश्नाचं उत्तर देताना कंगना म्हणाली की, 'स्वातंत्र्य जर भीक म्हणून मिळालं असेल तर ते स्वातंत्र्य असेल का? सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेता सुभाषचंद्र बोस या लोकांबाबत बोलायचं झाल्यास, या सर्वांना माहित होतं की रक्त सांडलं तर हे लक्षात ठेवावं लागेल की हे आपल्या भारतीयांचं नसेल. त्यांनी स्वातंत्र्याची किंमत चुकवली. पण ते स्वातंत्र्य नव्हतं. भीक होती. खरं स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळालं.'
हे ही वाचा -सलमान खुर्शीदनंतर राशिद अल्वी यांचे वादग्रस्त वक्तव्य, राम भक्तांना संबोधलं दानव
होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये भाजपचा सफाया !
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी महाविकास आघाडी सरकार उखडून टाकू असं वक्तव्य केलं आहे. मात्र होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये राज्यात भारतीय जनता पक्षाचा सफाया करू असा इशारा नवाब मलिक यांनी जे पी नड्डा यांना दिला. राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आणण्याचे स्वप्न नड्डा पाहत असतील तर आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. मात्र सरकार उखडून टाकण्याची भाषा ही लोकशाहीला मारक असल्याचे यावेळी नवाब मलिक म्हणाले