मुंबई - ‘कोविड - १९’ या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर दिवाळी साधेपणाने, फटाके न फोडता पर्यावरणपूरक साजरी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री आणि महापालिकेने केले आहे. याच पार्श्वभूमीवर दिवाळी निमित्त महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारालगत नवरंगांची उधळण करणाऱ्या फुलांचे ‘पॅलेट’ साकारले आहे. या ‘पॅलेट’च्या मध्यभागी कोविड प्रतिबंधात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेचे बोधचिन्ह दर्शवून सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नवरंगांची उधळण करणारे ‘पॅलेट’ -
‘कोविड - १९’ या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर यंदाची दिवाळी ही अधिक सजगतेने व अधिक सतर्कतेने साजरी करण्यासह अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करावयाची आहे. दिवाळी हा सण आनंदाचा आणि प्रकाशाचा असण्यासोबतच तो विविध रंगांचाही असतो. या निमित्ताने घरोघरी विविध पुष्परचना, फुलांची तोरणं साकारली जातात. याच शृंखलेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने महापालिका मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारालगत नवरंगांची उधळण करणारे ‘पॅलेट’ साकारले आहे.
हेही वाचा - सानिया मिर्झाची नवी इनिंग, मालिकेतून करणार डिजीटल पदार्पण
विशेष म्हणजे या ‘पॅलेट’मध्ये असणारे ८ रंग हे केवळ फुलांनी साकारले असून या ‘पॅलेट’च्या मध्यभागी कोविड प्रतिबंधात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेचे बोधचिन्ह देखील आहे. तर रंगांचे ‘पॅलेट’ तयार करण्यासाठी पांढरा, लाल, पिवळा, गुलाबी, केशरी, फिकट हिरवा, दुरंगी आणि दुरंगी गुलाब असे गुलाबाचे ८ प्रकार वापरण्यात आले असून गर्द गुलाबी रंगाची कारनेशनची फुलेही वापरण्यात आली आहेत. तर त्या शेजारी कुंड्यामधील हिरवाई देखील आहे. ही चित्ताकर्षक आणि नेत्रसुखद पुष्प कलाकृती बघण्यासाठी आणि कलाकृतीसह ‘सेल्फी’ काढण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांसह नागरिकांचीही लगबग या ठिकाणी दिसून येत आहे.
हेही वाचा - कोरोनापासून वाचण्यासाठी सनी लिओनिचा ट्रान्सपरंट उपाय
पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन -
बृहन्मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाद्वारे गेली काही वर्षे विविध सणांच्या निमित्ताने बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयात पुष्प कलाकृती साकारण्यात येत आहेत. यापूर्वी फुलांपासून तयार करण्यात आलेला मोर, फुलपाखरु, महापालिकेचे बोधचिन्ह, फुलांचा वापर करुन केलेले शुभेच्छा संदेश साकारण्यात आले होते. याच अंतर्गत यंदा फुलांचा वापर करुन तयार केलेले रंगांचे पॅलेट साकारण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेचे उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे. तर यंदाची दिवाळी ही अधिकाधिक पर्यावरण पूरक पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन या निमित्ताने महापालिकेद्वारे पुन्हा एकदा करण्यात येत आहे.