मुंबई - मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली आहे. अश्यात प्रत्येक जण पावसापासून रक्षण व्हावे म्हणून एक टिकाऊ आणि छानशी छत्री विकत घेत असतो. या छत्र्या घेताना अनेक वेळा तुम्ही ब्रँड, कंपनी, दर्जा अशा गोष्टी बघून घेत असता. पण, तुम्हाला माहिती आहे का? मुंबईत एक संस्था दिव्यांग, गतिमंद, विशेष मुलांना रोजगार देऊन त्यांना छत्र्या बनवण्याचं कौशल्य शिकवते. ही मुलं वर्षाला जवळपास 30 ते 40 हजार छत्र्या बनवतात. तेव्हा तुम्ही छत्री विकत घेत असाल तर ही बातमी नक्की पहा, कारण तुमची एक विकत घेतलेली छत्री एखाद्या दिव्यांग, गतिमंद मुलाला रोजगार मिळवून देऊ ( Handicapped Make Umbrellas ) शकते.
150 मुलं, 40 हजार छत्र्या, 72 प्रकार - विक्रोळी येथील नॅशनल असोसिएशन ऑफ डिसेंबल्ड एंटरप्राइजेस म्हणजेच नाडे या संस्थेत सध्या चाळीस हजार छत्र्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या सर्व छत्र्या इथे ट्रेनिंग घेतलेल्या दीडशे दिव्यांग आणि गतिमंद मुलांनी तयार केल्या आहेत. 72 प्रकारच्या रंगीबेरंगी, टिकाऊ, छोट्या मोठया अश्या या छत्र्या विक्रोळीच्या केंद्रात हे हात बनवत आहेत.
35 वर्ष दिव्यांगांसाठी रोजगार निर्मिती - यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'शी बोलताना संस्थेचे पदाधिकारी बिपिन जोशी म्हणाले की, "द नॅशनल असोसिएशन ऑफ डिसेबल एंटरप्राइजेस या संस्थेच्या माध्यमातून इथं ही मुलं छत्र्या बनवण्याचं काम करत असतात. 1987 साली या संस्थेची स्थापना झाली. विकलांगांसाठी रोजगार निर्मिती करून देण हा आमच्या संस्थेचा उद्देश आहे. मागील 35 वर्ष आमची संस्था याच एका उद्देशाने काम करते. यातील मागची पाच वर्षापासून आम्ही या मुलांना छत्र्या बनवण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केलेली आहे. दरवर्षी ही मुलं साधारण 30 ते 40 हजार छत्र्या बनवत असतात."
ऑनलाइन विक्री, व्यापाराची व्याप्ती - पुढे बोलताना बिपिन जोशी म्हणाले की, "आजकाल सर्वच ऑनलाईन मिळतं. आम्ही देखील या ऑनलाईन व्यापाऱ्याकडे वळलो. आमचा इंटरनेटवर देखील चांगला सेल आहे. आजच्या घडीला आमचा जास्तीत जास्त सेल हा ऑनलाइन विक्री मधूनच होतोय. इंटरनेटवर नेत्रा अम्रेला सर्च केलत तर आमच्या छत्र्या आणि त्यांचे हजारो पॅटर्न बघायला मिळतील. त्या नावानेच आमचं इंटरनेटवर स्टोअर आहे. विशेष म्हणजे आम्ही संपूर्ण भारतभर कुठेही शिपिंग चार्ज डिलिव्हरी चार्ज न घेता छत्री पाठवतो."
'तुमच्यामुळे आम्हाला रोजगार' - याच संस्थेत काम करणाऱ्या दिव्यांग ज्योती म्हणाल्या की, "मागची चार वर्षे झाली मी या संस्थेसोबत काम करते. आम्हाला इथं छत्र्या बनवण्याचं ट्रेनिंग दिले जातं. इथे येऊन छत्र्या नेमक्या कशा बनवल्या जातात हे आम्हाला शिकायला मिळालं. छत्र्या आम्ही वापरतो पण त्या कशा बनवल्या जातात हे माहिती नसायचं. ते इथे येऊन कळलं. आम्ही वर्षभर इथे छत्र्या बनवत असतो. विशेष म्हणजे आम्ही ज्या आणि जितक्या छत्र्या बनवतो त्या सर्व विकल्या जातात. माझी इथल्या लोकांना विनंती आहे तुम्ही जितक्या छत्र्या विकत घ्याल तितकाच आम्हाला रोजगार मिळेल आणि आम्हाला आर्थिक हातभार लागेल. त्यामुळे जास्तीत जास्त छत्र्या विकत घ्या," असं आवाहन देखील ज्योती यांनी केल आहे.
कोरोना संकट आणि सर्व बदललं - दोन वर्ष कोरोनामुळे संपूर्ण जग ठप्प झालं होतं. सर्व उद्योग धंदे बंद पडले होते. याचा फटका या मुलांना देखील बसला. दोन वर्ष या मुलांच्या हाताला काम नव्हतं. कोरोनानंतर या छत्र्या विक्रीला खिळ बसली आहे. ही विक्री सध्या ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. यामुळे नाडे तर्फे नागरिकांना या दिव्यांगांनी तयार केलेल्या छत्र्या खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.