मुंबई : पेगासस स्पायवेअरच्या माध्यमातून हेरगिरीच्या वृत्तावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देताना याच्या माध्यमातून राज्यातील नेत्यांचेही फोन टॅप केले जाण्याचा संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, यापूर्वीही नाना पटोलेंनी त्यांचे फोन टॅप होत असल्याची तक्रार थेट विधीमंडळातही केली होती.
राहुल गांधींसोबत करणार चर्चा
नाना पटोले मंगळवारी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधींची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यानही ते राज्यातील फोन टॅपिंग प्रकरणाविषयी चर्चा करणार असून पेगासस स्पायवेअरच्या माध्यमातून काँग्रेस नेत्यांच्या हेरगिरीच्या मुद्द्यावरही ते राहुल गांधींसोबत चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अधिवेशनातही पटोलेंनी केली होती तक्रार
नाना पटोले यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधीमंडळ अधिवेशनातही आपला फोन टाईप होत असल्याची तक्रार केली होती. आपला फोन टॅप केला जात असून याच्या चौकशीची मागणी पटोलेंनी विधानसभेत केली होती. या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली होती. याशिवाय आपल्यावर सातत्याने पाळत ठेवली जात असल्याचाही आरोप पटोलेंनी केला होता.
पेगासस हेरगिरीवरून संसदेत गदारोळ
पेगासस स्पायवेअरचा वापर करून देशातील विरोधी पक्षातील नेते मंडळी आणि पत्रकारांचे फोन टॅप करण्यात आल्याचे वृत्त आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिलं. यानंतर या वृत्ताचे पडसाद संपूर्ण देशभर उमटू लागले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा घेऊन विरोधकांनी चांगलाच गदारोळ केला.
काय आहे पेगासस स्पायवेअर ?
पेगासस एक स्पायवेअर सॉफ्टवेअर आहे. जे मोबाइल आणि कॉम्प्युटरमधून गोपनीय व वैयक्तिक माहिती चोरून हॅकर्सला पुरवते. याला स्पायवेयर म्हटले जाते. हे सॉफ्टवेअर तुमच्या फोनच्या माध्यमातून तुमची हेरगिरी करते. इस्रायलची कंपनी एनएसओ ग्रुपचा दावा आहे, की हे सॉफ्टवेअर जगभरातील अनेक सरकारांना सेवा पुरवते. याच्या माध्यमातून आयओएस किंवा अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम असणारे फोन हॅक केले जाऊ शकतात. त्यानंतर फोनचा डेटा, ई-मेल, कॅमेरा, कॉल रेकॉर्ड आणि फोटोसह प्रत्येक एक्टिव्हीटीला ट्रेस केले जाते.
कशी होते हेरगिरी ?
पेगासस स्पाइवेयर तुमच्या फोनमध्ये आले तर 24 तास तुमच्यावर हॅकरची नजर असणार आहे. हे सॉफ्टवे्र तुम्हाला पाठवलेल्या मेसेजची कॉपी करेल. तुमचे फोटो व कॉल रेकॉर्ड तत्काल हॅकर्सला पुरवील. तुम्हाला माहितीही होणार नाही, की पेगासस तुमच्या फोनमधूनच तुमचा व्हिडिओ बनवील. या स्पाइवेयरमध्ये माइक्रोफोनला एक्टिव करण्य़ाची क्षमता आहे. त्यामुळे कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका.
हेही वाचा - Pegasus Spyware : काय आहे पेगासस स्पाइवेयर अन् कसे करते हेरगिरी, भारताच्या राजकारणात वादळ