नागपूर - नागपूर शहरात ग्रीन फटाके विक्री करायला आणि फोडायला पोलीस विभागाकडून परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचे नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले आहे. गेले तीन दिवसांपासून नागपुरात सर्रास फटाके विक्री सुरू असून लोकं ही वेळ न पाळता फटाके फोडत आहेत. त्यामुळे नागपूर पोलिसांनी फटाके विक्री आणि फोडणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे.
...अन्यथा गुन्हा होणार दाखल -
दिवाळी साजरी करताना ग्रीन ट्रीबुनल आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची कठोर अंमलबजावणी नागपूर शहरात करण्यात येणार आहे. नागपूरात रात्री 10 नंतर फटाके फोडणाऱ्यांवर पोलीस थेट गुन्हे दाखल करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाला अनुसरून पोलिसांनी नागपुरात फटाके फोडण्याची वेळ संध्याकाळी 8 ते 10 अशी ठरवून दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फक्त ग्रीन फटाके फोडण्याची परवानगी आहे. त्यामुळे फटाका विक्रेत्यांनी ही फक्त ग्रीन फटाक्यांची खरेदी आणि विक्री करावी. तसेच ग्राहकांनीही फटाके विकत घेताना, ते ग्रीन फटाके आहे की नाही याची खातरजमा करावी, असे आव्हान पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.
शहरात 33 पोलीस पथक तैनात -
दिवाळीत ग्रीन ट्रीबुनल आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी होते आहे की नाही, हे तपासण्यासाठी नागपूर शहरात 33 विशेष पथक नेमण्यात आले आहे. काल रात्री चार ठिकाणी पोलिसांनी कारवाई सुद्धा केली आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केले आहे.
हेही वाचा - Diwali 2021 : आज लक्ष्मीपूजन! 'ही' आहे पुजेची योग्य वेळ, लक्ष्मी होईल प्रसन्न...