मुंबई - शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी 50 आमदारांसोबत शिवसेनेतून बाहेर पडून भाजपासोबत सरकार स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली. शिवसेनेच्या या बंडखोर आमदारांमुळे शिवसेनेत उभी फूट पडली. या फुटीचा परिणाम आगामी महानगरपालिका ( Municipal Corporation ) निवडणुकांमध्ये दिसणार आहे विशेषतः मुंबई आणि ठाणे या दोन मोठ्या महानगरपालिकांवर याचा सर्वाधिक परिणाम दिसणार आहे.
शिवसेनेची ठाण्यात पहिली सत्ता - शिवसेनेने पक्ष म्हणून ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदा सत्ता स्थापन केली ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा पहिल्यांदा लागला. आनंद दिघे यांचा नेतृत्वाखाली ठाण्यात शिवसेना जोरदार वाढली. आनंद दिघे यांचे शिष्य मानल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदे आणि रवींद्र फाटक यांनी शिवसेनेला अधिक बळ दिले. मात्र, आता एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यामुळे आगामी ठाणे महानगरपालिकेत शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. शिंदे गटाकडे सध्या 67 नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात जेव्हा निवडणुका होतील, तेव्हा हे नगरसेवक कोणासोबत राहतील आणि शिवसैनिक कोणासोबत राहतात हे महत्त्वाचे आहे.