मुंबई - रेल्वे पोलिसांचा फौजफाट्यातील सर्वात महत्त्वाचा आणि आपत्कालीन परिस्थितीत भक्कम आधार असलेल्या श्वान पथकासाठी वाईट बातमी आहे. आरपीएफ विभागातील कल्याण पथकातील चीना श्वानाचा आजारपणामुळे मृत्यू झाला. काही दिवसानंतर चीना श्वान निवृत्त होणार होता. मात्र, त्या पूर्वीच उपचार दरम्यान चीना श्वानाचा मृत्यू झालेला आहे.
नऊ वर्ष दिली सेवा-
कल्याण श्वान पथकात श्वान चीना विस्फोटक पदार्थ शोधणारा होता. चीना एप्रिल 2012 पासून सेवा बजावित होता. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बाॅम्बशोधक पथकात महत्त्वाची भूमिका चीनाद्वारे पार पाडण्यात येत होती. मध्य रेल्वे स्थानकात आरपीएफने चीनाच्या मदतीने अनेकदा तपासणी मोहीम हाती घेतली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून चीनाची तब्येत खालावलेली होती. दरम्यान, सोमवारी प्रकृती खालवल्याने चीनाला परळ येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आरपीएफने कल्याण श्वान पथकाच्या मैदानात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार केले. चीना श्वानाचा जन्म २६ फेब्रुवारी २०१२ झाला असून मध्य रेल्वेचा आरपीएफमध्ये १९ एप्रिल २०१२ रोजी भरती झालेला होता. चीना श्वान या महिन्या २६ फेब्रुवारी २०२२ ला निवृत्त होणार होता. मात्र, निवृत्त होण्याचा १२ दिवसा अगोदर आजारपणामुळे चीना श्वानाचा मृत्यू झालेला आहे. चीना श्वान हा ९ वर्ष अकरा महिन्याचा होता.
चीना सदैव असायचा तत्पर -
कल्याण श्वान पथकाचे सहाय्यक उप निरीक्षक पंडित लोट यांनी सांगितले की, वेळोवेळी चेकिंग ड्यूटी केली जात होती. मात्र, चेकिंग ड्यूटीच्यावेळी कोणत्याही प्रकारची विस्फोटक सामग्री स्थानक अथवा स्थानक परिसरात, पार्सलमध्ये मिळाले नाही. श्वान दररोज सेक्शनमध्ये आपले कर्तव्य इमानदारी आणि पूर्ण निष्ठेने करत होते. एक कामगिरी केल्यानंतर दुसरी कामगिरी करण्यासाठी तत्पर असायचा. मृत श्वान चीना शेवटच्या वेळी विस्फोटकामध्ये खूप सुंदर काम करत होते.
चार श्वान पथक-
मध्य रेल्वे मुंबई विभागात एकूण चार श्वान पथक आहेत. माटुंगा, कल्याण, कर्नाक बंदर, एलटीटी येथे श्वान पथक विभाग आहे. या श्वान पथकात डॉबरमन, लेब्रोडोर रिट्रीवर (स्निपर) या जातीचे श्वान आहेत. विस्फोटक,अंमली पदार्थांचा गंध घेऊन शोध घेण्यासाठी लेब्रोडोर रिट्रीवर (स्निपर) श्वानाचा वापर केला जातो. तर, प्रवाशांची सुरक्षा, स्थानकावर गस्त घालण्यासाठी डॉबरमन श्वानाचा वापर केला जातो.