मुंबई - अभिनेता सुशांत राजपूतच्या आत्महत्येनंतर नेहमीच चर्चेत राहिलेले व वादात सापडलेले रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई पोलिसांच्या संदर्भात नाहक बदनामी केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलीस डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांच्याकडून सत्र न्यायालयामध्ये अर्णब व त्यांच्या पत्नीविरोधात मानहानीचा दावा करण्यात आला आहे.
पोलीस तपास सुरू असताना केली जात होती टीका
सुशांत राजपूतने त्याच्या वांद्रेस्थित घरात आत्महत्या केल्यानंतर यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून तपास केला जात होता. मात्र, तपासादरम्यान सतत मुंबई पोलिसांच्या विरोधात टीकात्मक वार्तांकन करून या संदर्भात सुरू असलेल्या तपासाचा मुद्दा तोडूनमोडून प्रसारित केल्याबद्दल मुंबई पोलिसांची बदनामी झाल्याचा आरोप मुंबई पोलिसांकडून करण्यात आला आहे. तपास अधिकाऱ्यांवर यामुळे दबाव येत असल्याच्या कारणामुळे मुंबई पोलिसांकडून मानहानीचा दावा सत्र न्यायालयात दाखल करण्यात आला आहे.
जामिनावर सुटका
अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी गोस्वामी यांना रायगड पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळाल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती. यानंतरही मुंबई पोलिसांच्या विरोधात वार्तांकन होत असल्याच्या कारणामुळे अर्णब नेहमीच चर्चेत राहिले आहेत. काही महिन्यांपूर्वी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन देशातील सर्वात मोठा टीआरपी घोटाळा उघडकीस आणला होता आणि या संदर्भात या घोटाळ्यात गोस्वामींच्या वृत्तवाहिनीचे नाव असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
पार्थो दासगुप्तांना दिले होते 40 लाख
BARCचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता व रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यादरम्यान घडलेल्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये देशाच्या सुरक्षेशी निगडित गोपनीय गोष्टींबद्दल माहिती एकमेकांना देण्यात आलेली होती. याबरोबरच पार्थो यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात मुंबई पोलिसांना दिलेल्या जबानीत कबूल केले होते, की टीआरपीमध्ये फेरफार करण्यासाठी अर्णब यांच्याकडून त्यास दोन परदेशी दौऱ्यासाठी 12 हजार अमेरिकन डॉलर व टप्प्याटप्प्याने 40 लाख रुपये देण्यात आले होते.