मुंबई - टीआरपी घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी आज आणखी एक आरोपपत्र दाखल केले आहे. एकूण 1,912 पानांचे पुरवणी दोषारोपपत्र न्यायालयात तपास यंत्रणांनी सादर केले आहे. रिपब्लिक चॅनलचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह 22 व्यक्तींना आरोपी करण्यात आले आहे. ताज्या आरोपपत्रात आणखी सात जणांची नावे आरोपी म्हणून आहेत.
अर्णब गोस्वामी, प्रिया मुखर्जी, शिवा सुब्रमन्यम, अमित दवे, संजय वर्मा, शिवेंद्र मुलधेरकर आणि रणजित वाॅल्टर हे मुख्य आरोपी तसेच नंबर 16 ते 22 यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.
काय आहे टीआरपी घोटाळा -
टीव्ही चॅनेल्सच्या उद्योगाला हादरवून सोडणारा हा घोटाळा आहे. देशातील टीव्ही वाहिन्यांच्या उद्योगाचा आकार हा ३० ते ४० हजार कोटींचा आहे. काही चॅनेल्सनी टीआरपी वाढवण्यासाठी रॅकेट चालवल्याचा आरोप तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. इंग्रजी येत नाही अशा व्यक्तींच्या घरी इंग्रजी चॅनल टीआरपी म्हणजेच टेलिव्हीजन रेटींग पॉईंट वाढवण्यासाठी काही चॅनल्सनी पैसे दिले आणि हे रॅकेट मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने उद्ध्वस्त केले होते. असा दावा परमबीर सिंग यांनी केला होता. या आरोपींनी ज्या घरांमध्ये टीआरपी मिटर लावले होते. त्या प्रेक्षकांना संपर्क साधून त्यांना विशिष्ट चॅनल पाहण्यासाठी बाध्य केले गेले. त्यांना पैसेही दिले गेले, असा आरोपही त्यांनी केला होता.
टीआरपीनुसार जाहिरातीचा दर -
टीआरपीमध्ये वाढ झाल्यास त्याचा फायदा या चॅनेल्सना जाहीरातीचे दर वाढवण्यात आणि व्यवसाय वाढवण्यात कामी येत असतो.
विशिष्ट चॅनल पाहण्याची लोकांना दिले पैसे -
हंसा कंपनीकडे टीव्हीला बॅरोमिटर लावायचे काम दिले होते. हे मिटर लावतानाची जी काही माहिती असते ती गुप्त ठेवली जात असते. मात्र, काही ठिकाणी पैसे देऊन हे मिटर लावले जात असल्याचा आणि एक प्रकारचे रॅकेट यात काम करत असल्याची हंसाच्या एका माजी कर्मचाऱ्याने मुंबई पोलिसांना तक्रार दिली होती. तक्रारीच्या आधारावर प्रकरणाचा तपास केला असता या कर्मचाऱ्याच्या खात्यात २० लाख रूपये असल्याचे आढळून आले. तसेच त्याच्या बँक लॉकरमध्येही साडे आठ लाख रूपये असल्याचे निदर्शनास आले. ही सगळी रक्कम जप्त करण्यात आल्याचेही पोलीस आयुक्तांनी सांगितले होतं.
अत्यंत गरीब लोकं राहतात किंवा जिथे झोपडपट्टीसारखी वस्ती आहे. त्या भागांत असे मिटर लावण्यात आले आणि त्या ठिकाणच्या लोकांना पैसे देऊन विशिष्ट चॅनल पाहायला लावले जात असल्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली होती. मुंबई पोलिसांनी हंसाच्या माजी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर तपास केला आणि या रॅकेटचा पर्दाफाश केला.