मुंबई - एकनाथ शिंदे यांची की उद्धव ठाकरे यांची शिवसेना खरी यावरून वाद सुरु असताना शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी थेट एकनाथ शिंदे यांना पाठींबा दिला आहे. आज मुंबईमधील माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी शिंदे यांना पाठींबा दिला आहे. शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या त्या मुंबईमधील पहिल्या माजी नगरसेविका आहेत. विशेष म्हणजे कडवट शिवसैनिक म्हणून शीतल म्हात्रे यांची ओळख आहे.
शीतल म्हात्रे शिंदे गटात - शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडले. शिंदे यांनी भाजपच्या पाठींब्यावर मुख्यमंत्री पद मिळवले. त्यानंतर राज्यातील महानगरपालिकांमधील शिवसेनेच्या नगरसेवकांनी थेट शिंदे यांना पाठींबा दिला आहे. मुंबई महानगरपालिकेतील माजी नगरसेवक शिंदे यांच्या गटात जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यानंतर काही दिवसातच शिवसेनेच्या दहीसर पश्चिम येथील वॅार्ड क्रमांक ७ च्या नगरसेविका व शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. त्यांनी आपल्या समर्थकांसह मुख्यमंत्री शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
म्हात्रे यांच्याकडून बंडखोरांवर टीका - दोनच दिवसांपूर्वीच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दहीसर, बोरिवली आणि मागाठाणे मतदारसंघात निष्ठा यात्रा काढली होती. खासदार संजय राऊत यांनीही शीतल म्हात्रे यांची स्तुती केली होती. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांचे पती स्थायी समिती अध्यक्ष यांच्यावर नुकतीच म्हात्रे यांनी टीका केली होती. त्यानंतर त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिला आहे.
कोण आहेत शीतल म्हात्रे - शीतल म्हात्रे या युवा सेनेच्या म्हणजेच आदित्य ठाकरे यांच्या कार्यकर्त्या आहेत. त्यांनी २०१२ आणि २०१७ मध्ये दहिसर येथून निवडणूक जिंकून दोन वेळा नगरसेविका पद भूषविले आहे. त्यांची पालिकेच्या शिक्षण समिती व विधी समितीच्या अध्यक्षपदावर शिवसेनेने नियुक्ती केली होती.
कार्यकर्त्यांनी केली मारहाण - शीतल म्हात्रे यांच्या कार्यकर्त्यानी एका तरुणाला मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली आहे. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये नोंद झाला. या प्रकरणी बोरोवळी येथील एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फोटोला काळे फासले - मुंबईतील दहिसर पूर्व प्रभाग क्रमांक 7 च्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल मुकेश म्हात्रे आज शिंदे गटात दाखल झाल्या. संजय राऊत यांनी ज्या नगरसेवकाला अग्निकन्या असे नाव दिले. ती आज बांदखोर संघात सामील झाली. याला विरोध करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रभाग क्रमांक 7 मधील शाखेवर फोटोला काळे फासले आहे. त्यानंतर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
हेही वाचा - Three Children Drown In Pune : शेतातील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून तीन लहान मुलांचा मृत्यू