मुंबई - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेचे अनेक आमदार पक्षातून बंडखोरी करून, बाहेर पडले आहेत. हे आमदार आधी सुरत त्यानंतर गुहाटी येथे तंबू ठोकून होते. गुहाटी वरून अनेक आमदारांना पाचारण करण्यात आले होते. विविध ऑफर देण्यात आल्या त्याप्रमाणे मलाही ऑफर देण्यात आली होती, पण मी गेलो नाही असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत ( Shiv Sena MP Sanjay Raut ) यांनी केले आहे.
संजय राऊत यांची ईडी चौकशी - मुंबईतील पत्राचार जमीन गैरव्यवहार प्रकरणी खासदार संजय राऊत यांची ईडीमार्फत शुक्रवारी चौकशी करण्यात आली होती. या चौकशीनंतर सुद्धा संजय राऊत यांनी आपला टीकेचा भडिमार सुरूच ठेवला होता. ईडीच्या चौकशी नंतर संजय राऊत यांनी मलाही गुहाटीवरून ऑफर होती. परंतु मी गेलो नाही बाळासाहेबांच्या विचारावर ठाम आहे. त्यामुळे मला घाबरण्याची ही गरज नाही, असे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यातून हे स्पष्ट दिसून येते की, गोहाटी येथे गेलेले अनेक आमदार हे एक तर आमिषामधून गेलेले आहेत किंवा त्यांना केंद्रीय यंत्रणांचा धाक दाखवून नेण्यात आलेले आहे.
मी ईडीला घाबरत नाही - मी काहीही चुकीचं केलेले नाही, असं खासदार संजय राऊत सातत्याने सांगत आहेत. त्यामुळे मी ईडीच्या चौकशीला घाबरत नाही. ईडीच्या चौकशीला आपण घाबरत नसल्याने कोणत्याही ऑफरला स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही, असे वक्तव्य करून संजय राऊत यांनी जे आमदार शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. त्यांच्याबाबत अप्रत्यक्षरित्या प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ राजकीय विश्लेषक दिलीप सपाटे यांनी व्यक्त केली आहे.