मुंबई - सध्याच्या घडीला शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेटपणे अंगावर घेण्याची ताकद ज्या नेत्यांमध्ये आहे. त्यामध्ये नारायण राणे हे नाव अग्रस्थानी आहे. एकेकाळी कट्टर शिवसैनिक असणारे नारायण राणे काँग्रेस, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष असा प्रवास करुन आता भाजपमध्ये स्थिरावले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभाव पाडणारी, वादांची वादळे झेललेली अनेक नावे विविध पक्षात आजवर आपल्यासमोर आली आहेत. शिवसेनेत अशी दोन मोठी नावे होती. एक म्हणजे छगन भुजबळ आणि दुसरे म्हणजे नारायण राणे.
मोदी २.० मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार काही दिवसांपूर्वी पार पडला. यात भाजप नेते नारायण राणे यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. त्यानंतर त्यांनी जनआशिर्वाद यात्रा आयोजित केली. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबईतील स्मारकावर जाऊन आशिर्वाद घेतले. त्याला शिवसेनेच्या नेत्यांनी विरोध केला होता. आता त्यांनी मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांना कानशिलात लावण्याची भाषा केली आहे. त्यावरुन बऱ्याच ठिकाणी प्रक्षोभक आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमिवर जाणून घेऊयात कोण आहेत नारायण राणे....
कोण आहेत नारायण राणे ? आणि कशी घडली राणेंची राजकीय जडणघडण ?
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील वरवडे गावात झाला. मुंबईत सुभाष नगर येथील चाळीत राहणाऱ्या एका गरीब कुटुंबातील मुलगा ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा यशस्वी टप्पा गाठणारा नेता म्हणजे नारायण राणे. राणे यांचे मूळ गाव वरवडे-फलशीयेवाडी, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग या ठिकाणी आहे. नारायण राणे यांचे शिक्षण कमी झाले आहे. त्यांचे शिक्षण मॅट्रीकपर्यंतही झालेले नाही. मात्र प्रशासनाचा जाण व प्रशासनावर असलेली पकडे यामुळे मंत्री असताना व मुख्यमंत्री पद सांभाळताना त्यांना कुठेही अडचण आली नाही.
राजकारणात येण्याअगोदर नारायण राणे यांनी मित्रासोबत सुभाष नगर येथे चिकन शॉप सुरु केले होते. १९६० साली हऱ्या - नाऱ्या टोळीची मुंबईत दहशत होती. या टोळीसोबत राणेंचे संबंध आले आणि त्यांचे नाव सगळीकडे पोहोचले. हऱ्या - नाऱ्या जिंदाबाद या नावाने एक चित्रपट सुध्दा त्या काळात येऊन गेला. याच काळात नारायण राणे यांच्या नावाने खुनाचा गुन्हा देखील घटाला पोलीस स्टेशनला नोंद झाला होता. पोलीस रेकॉर्ड नुसार वयाच्या १४ व्या वर्षी राणे टोळीचे सदस्य झाले. माधव ठाकूर व राणे यांचा वाद या काळात बराच गाजला.
वयाच्या २० व्या वर्षी राणे यांचे संबध शिवसेनेसोबत आले. चेंबूर येथे शाखा प्रमुख पद राणेंना देण्यात आले. कोपरगावचे नगरसेवक ही त्याची पहिली निवडणूक व ते यशस्वी झाले व त्यांनतर त्यांनी राजकारणात अनेक पदे मिळवली. ८ ऑक्टोबर २००८ साली नारायण राणे यांनी प्रहार नावाचे वृत्तपत्र सुरु केले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व तत्कालीन सहकारमंत्री पतंगराव कदम यांच्या हस्ते या वृत्तपत्राचा शुभारंभ करण्यात आला. २००९ साली त्यांनी परत महाराष्ट्राचे महसूलमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. नारायण राणे यांची दोन मुले नितेश व निलेश हे दोघेही राजकारणात आहेत.
शिवसेनेत अनेक पदांवर संधी -
शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. आक्रमक स्वभावाचे नारायण राणे शिवसेनेत वेगाने पायऱ्या चढत वर गेले. सुरुवातीला चेंबुरमध्ये शाखाप्रमुख असलेले राणे 1985 साली मुंबई महानगरापालिकेच्या बेस्ट समितीचे अध्यक्ष झाले. त्यानंतर 1990 साली कणकवली-मालवण मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार झाले. 1995 मध्ये युतीची सत्ता आल्यावर त्यांच्याकडे दुग्धव्यवसाय विकास, पशु संवर्धन, मत्स्यव्यवसाय, खार जमिनी, विशेष सहाय्य व पुनर्वसन, उद्योग या खात्यांचा कारभार सोपवण्यात आला.
1997 साली त्यांच्याकडे महसूल खाते सोपवण्यात आले. मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर 1998 ते 99 या काळात त्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली. 2005 साली शिवसेना सोडून ते काँग्रेसवासी झाले. 2009 मध्ये पुन्हा काँग्रेस आघाडी सत्तेत आल्यावर राणेंना उद्योग खाते मिळाले. मात्र मुख्यमंत्रीपदाची आस बाळगून आलेल्या राणेंची काँग्रेसमध्ये घुसमट वाढली व त्यांनी आपला स्वंत्र पक्ष काढला. त्यानंतर आता भाजपमध्ये आल्यानंतर नारायण राणे यांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे.
१९९१ मध्ये विरोधी पक्षनेते तर १९९९ ला मुख्यमंत्री -
महाराष्ट्रात घडलेल्या 1991 च्या राजकीय नाट्यानंतर छगन भुजबळांनी शिवसेना सोडली आणि विधीमंडळातल्या विरोधीपक्ष नेतेपदाची संधी आमदार नारायण राणेंकडे चालून आली. त्यानंतर शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये राणे 1996 ला महसूल मंत्री झाले. या सरकारच्या शेवटच्या टप्प्यात मनोहर जोशी यांचा राजीनामा घेऊन 1 फेब्रुवारी 1999 ते 17 ऑक्टोबर 1999 या काळात राणेंना मुख्यमंत्री पदावर बसविण्यात आले.
राणेंचे आत्मचरित्र -
शिवसेनेतून फुटून आलेल्या दोन नेत्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव राहिला. एक म्हणजे भुजबळ व दुसरे राणे. भुजबळ तुरुंगात गेल्याने त्यांच्या राजकीय भवितव्यावर नियंत्रण आले. राणेंचे मात्र तसे नाही. ते आजही राज्याच्या राजकारणाची गणिते बदलू शकताता. राणेंनी नवा पक्षही स्थापन केला आहे. त्यांनी 'No Holds Barred - My Years in Politics' (कोणतेही तत्त्व किंवा नियम लागू नसलेलं भांडण) असे आत्मचरित्रही लिहिले आहे. त्यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यात त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख मांडला आहे. नो होल्ड्स बार्ड ( 'झंझावात') असे आणखी एक आत्मचरित्र राणेंचे आहे.
शिवसेनेतील राणे -
आज वयाची ६८ वर्षे पूर्ण केलेल्या राणेंनी राजकीय कारकिर्दीतील चढ-उतार आणि नाट्यमय वळणं पाहिली आहे. सिंधुदुर्गातून मुंबईत रोजगार मिळवणाऱ्या असंख्य सामान्य तरुणांप्रमाणे नारायण तातू राणेही मुंबईत आले व वयाच्या विशीत शिवसैनिक झाले.
बाळासाहेब ठाकरेंनीही राणेंच्या क्षमतेचा व आक्रमकतेचा वापर शिवसेनेसाठी करून घेतला. राणेंनीही कोकणात, मुंबईत शिवसेना वाढवण्यासाठी कष्ट घेतले. चेंबूरचे शाखाप्रमुख झालेल्या राणेंनी नंतर संघटनेत आणि राजकीय कारकिर्दीत मागे वळून पाहिले नाही. आधी नगरसेवक, मग मुंबईची सार्वजनिक परिवहन सेवा 'बेस्ट'चे अध्यक्ष, अशी राणेंची राजकीय कमान चढती राहिली.
दरम्यान, 1991 साली भुजबळांनी सेना सोडली आणि विधीमंडळातल्या विरोधपक्ष नेतेपदाची संधी आमदार राणेंकडे चालून आली. त्यानंतर १९९५ मध्ये महाराष्ट्रात झालेल्या ऐतिहासिक सत्तांतरात शिवसेना-भाजप युती सरकारात राणे महसूल मंत्री झाले. युती सरकारच्या शेवटच्या टप्प्यात मनोहर जोशींना गैरव्यवहारांच्या आरोपांचा सामना करावा लागला. बाळसाहेब ठाकरेंनी जोशींचा राजीनामा घेतला आणि नारायण राणे मुख्यमंत्री झाले. मात्र एक वर्षाच्या मुख्यमंत्रिपदापेक्षा राणे विरोधी पक्षनेतेपदासाठी अधिक ओळखले गेले. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला अधिवेशन काळात राणेंची धास्ती असायची.
मात्र, याच काळात बाळसाहेब ठाकरेंनी आपला उत्तराधिकारी म्हणून शिवसेना कार्याध्यक्षपदी उद्धव ठाकरेंची निवड केली आणि सेनेतले दोन नेते दुखावले गेले. एक होते राज ठाकरे आणि दुसरे नारायण राणे. 2005 मध्ये नारायण राणेंनी काही आमदारांसोबत शिवसेना सोडली आणि ते काँग्रेसवासी झाले. राणेंचा शिवसेनेतला अध्याय संपला.
मुख्यमंत्रीपदाची आस घेऊन काँग्रेसवासी झालेले राणे -
२००५ मध्ये काँग्रेसमध्ये दाखल झालेले राणे स्वस्थ नव्हते. राणेंची महत्त्वाकांक्षा मुख्यमंत्रिपदाची होती. यातूनच ज्या विलासराव देशमुखांनी त्यांना काँग्रेसमध्ये आणले त्यांच्याचविरोधात राणेंनी आघाडी उघडली. ही बाब काँग्रेस पक्षश्रेष्ठींना खटकली. 2009 मध्ये पुन्हा काँग्रेस आघाडी सत्तेत आल्यावर राणेंना उद्योग खाते मिळालं. याच दरम्यान सोनिया गांधी, अहमद पटेल, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका करून राणेंनी हायकमांडची खप्पामर्जी ओढावून घेतली. 2014 नंतर राज्यात भाजप सत्ते आले व फडणवीस मुख्यमंत्री झाले. राणेंच्या त्यांच्यासोबत भेटी झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. सरकारच्या काही कार्यक्रमातही राणे दिसले.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत राणेंनी काँग्रेस सदस्यांचा स्वतंत्र गट बनवली त्यानंतर काँग्रेसने ही समितीच बरखास्त केली. त्यावेळी राणेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांवर आगपाखड केली. मात्र काँग्रेसने याची दखल घेतली नाही व नारायण राणेंसारखा आक्रमक नेता भाजपच्या गळाला लागू दिला. त्यामुळे राज्याची नसली, तरी किमान कोकणातली राजकीय गणिते बदलली.
कोँग्रेसकडून राणेंना उद्योग खाते -
2009 मध्ये आघाडी सरकारमध्ये नारायण राणे यांच्याकडे उद्योग खाते देण्यात आले. राणेंची महत्त्वाकांक्षा मुख्यमंत्रिपदाची होती. त्यामुळे ते काँग्रसमध्येही स्वस्थ नव्हते. शेवटी राणेंनी काँग्रेस सोडली आणि 2018 मध्ये स्वतःचा 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' काढला. याच दरम्यान नारायण राणे भाजपच्या तिकिटावर राज्यसभेवर गेले. नारायण राणे यांचा स्वाभिमानी पक्ष सुद्धा भाजपमध्ये विलीन झाला. ऑक्टोबर 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा विलिनीकरण सोहळा पार पडला.
महाराष्ट्र स्वाभिमान' या पक्षाची स्थापना -
राणेंनी काँग्रेसमधून बाहेर पडून १ ऑक्टोबर २०१७ रोजी 'महाराष्ट्र स्वाभिमान' या पक्षाची स्थापना केली. २०१९ विधानसभा निवडणुकीत त्यांना कुडाळ मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला. २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन केला. नारायण राणेंची भाजपच्या कोट्य़ातून राज्यसभेवर वर्णा लागली.
भाजपच्या तिकीटावर राज्यसभेवर निवड -
3 एप्रिल 2018 मध्ये नारायण राणे यांची भाजपच्या तिकिटावर राज्यसभेवर निवड झाली. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर राणेंची एकहाती सत्ता आहे. राणे यांचे स्वतःचे सिंधुदुर्गात इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज आणि अत्याधुनिक हॉस्पिटल आहे.
नारायण राणे- उद्धव ठाकरे संघर्षाचे कारण काय ?
महाराष्ट्रात 1995 साली युतीची सत्ता आली तेव्हा शिवसेनेत उघडउघड दोन गट होते. एकीकडे उद्धव ठाकरे, मनोहर जोशी आणि सुभाष देसाई होते. तर दुसऱ्या बाजूला राज ठाकरे, नारायण राणे आणि स्मिता ठाकरे होते. 1999 साली बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर जोशींना हटवून नारायण राणेंना मुख्यमंत्रिपदी नेमण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राच्या राजकारणात टिकून राहण्यासाठी मराठा चेहऱ्याची गरज आहे, हे बाळासाहेबांना जाणवलं होते. मात्र मनोहर जोशी यांना हटविण्याच्या निर्णयावर उद्धव ठाकरे हे फारसे खूश नव्हते. उद्धव आणि नारायण राणेंमधील बेबनावाची ही पहिली ठिणगी होती.
नारायण राणेंना अवघे नऊ महिन्यांचं मुख्यमंत्रिपद मिळालं. महाराष्ट्र विधानसभा मुदतीपूर्वी विसर्जित करून निवडणुका घेण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने घेतला. या निवडणुकीत सेना-भाजप युतीचा पराभव झाला. नारायण राणेंनी आपल्या 'No Holds Barred - My Years in Politics' (कोणतेही तत्त्व किंवा नियम लागू नसलेलं भांडण) आत्मचरित्रात या पराभवाचं खापर उद्धव ठाकरेंवर फोडलं.
1999 साली उद्धव ठाकरेंमुळे युतीची सत्ता गेली ?
आपल्या आत्मचरित्रात राणेंनी लिहिलं आहे१९९९ मध्ये 171-117 असा फॉर्म्युला ठरवला गेला. शिवसेनेने आपल्या कोट्यामधून 10 जागा इतर मित्र पक्षांना देण्याचे निश्चित केले. शिवसेनेच्या उमेदवारांची नावे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सहीने 'सामना'मध्ये गेली, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी ती पाहिली. या यादीमध्ये उद्धव यांनी परस्पर 15 उमेदवारांची नावे बदलली आणि आम्हा सर्वांना अंधारात ठेवून निर्णय घेतला, असं राणे यांनी पुस्तकात नमूद केलं आहे. ज्या 15 उमेदवारांची नावं उद्धव यांनी बददली होती. त्यांपैकी 11 उमेदवार हे अपक्ष म्हणून किंवा दुसऱ्या पक्षांतून लढले आणि विजयीही झाले. या निवडणुकीत शिवसेनेचे 69 उमेदवार निवडून आले. हे अकरा बंडखोर आमदार पक्षात असते, तर सेनेच्या आमदारांची संख्या 80 झाली असती. भाजपचेही 56 आमदार निवडून आले होते. त्यामुळे अपक्ष आणि अन्य लहान पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करणं युतीला शक्य झालं असतं. पण ही संधी हातातून गेली.
उद्धव कार्याध्यक्ष झाल्यानंतर सोडली शिवसेना -
1999 मध्ये राज्यात सत्तांतर झाले. काँग्रेस राष्ट्रवादीचे आघाडी सरकार आले. यावेळी राणे विरोधी पक्षनेते झाले. बाळासाहेब ठाकरे यांनी 2003 साली महाबळेश्वर येथील अधिवेशनात उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी निवड केली. त्यावेळी नारायण राणे प्रचंड दुखावले गेले. 2004 साली त्यांनी शिवसेना सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मालवण विधानसभा मतदारसंघातून ते यावेळी झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करून विक्रमी मताने निवडून आले. त्यांची आघाडी सरकारमध्ये महसूलमंत्रीपदी वर्णी लागली.
शिवसेनेचे महाबळेश्वर अधिवेशन आणि राणे-उद्धव शेवटची ठिणगी -
2002 साली राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सत्यविजय भिसे यांची हत्या करण्यात आली. कणकवलीपासून 15 किलोमीटर अंतरावरच्या शिवडावमध्ये ही हत्या झाली. नारायण राणे तेव्हा विरोधी पक्षनेते होते. या हत्येनंतर राणेंच्या कणकवलीतल्या घराची जाळपोळ झाली होती. पण त्यावेळेस शिवसेनेचा कोणताही नेता कोकणात आला नाही किंवा राणेंच्या बाजूने ठामपणे उभा राहिला नाही. या प्रसंगापासून राणे शिवसेनेपासून दुरावण्याचा वेग वाढला,
जानेवारी 2003 मध्ये महाबळेश्वर इथे शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी होती. याच कार्यकारिणीमध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या नावाची कार्यकारी प्रमुख म्हणून घोषणा केली. मात्र नारायण राणेंचा या प्रस्तावाला विरोध होता. आपल्याला काहीच माहीत नसल्याचे बाळासाहेब ठाकरेंनी म्हटले होतं. हा प्रस्ताव मांडला जाण्याच्या आधी राणे बाळासाहेबांना भेटले होते. उद्धव यांच्या नावाला त्यांनी विरोध केला होता. पण बाळासाहेबांनी त्यांना सांगितलं, की नारायण, आता निर्णय झालाय. यानंतर राणे-उद्धव यांच्यातली दरी रुंदावत गेली.
शिवसैनिक म्हणून राणेंचे रंगशारदामधील 'ते' शेवटचेच भाषण
२००४ मध्ये राणेंनी रंगशारदा येथे भरलेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलताना 'सेनेमध्ये पदांचा बाजार मांडला जातोय,' असं वक्तव्य केले होते. बाळासाहेब ठाकरेंनी रंगशारदामधील मेळाव्यातच शिवसैनिकांना संबोधित करताना राणेंच्या या वक्तव्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. 2004 साली नारायण राणे विरोधी पक्षनेते होते. ते परदेशात गेले होते. ते परत आले तेव्हा त्यांच्याविरोधातली नाराजी विकोपाला गेली होती आणि राणेंचीही पक्षातली घुसमट वाढली होती. त्यातून 2005 साली नारायण राणेंनी शिवसेनेला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
नारायण राणेंनी राज ठाकरेंचा 'तो' प्रस्ताव नाकारला -
नारायण राणे यांनी आपल्या आत्मचरित्रात राज ठाकरे यांच्याबाबतचा एक किस्सा सांगितला आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर नारायण राणे एकदा राज ठाकरेंच्या भेटीला गेले असता राज ठाकरे यांनी आपणही शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या विचारात असल्याचे सांगितले.
त्यावेळी राज ठाकरे यांनी आपण दोघांनी मिळून एक पक्ष काढू, असा प्रस्ताव नारायण राणे यांच्यासमोर मांडला होता. या प्रसंगाबद्दल सांगताना नारायण राणे यांनी लिहिले आहे की, हे ऐकायला फार छान वाटत असले तरी मला पाय जमिनीवर ठेवणे भाग होते. मी त्यांना म्हणालो, राज, मी एका ठाकरेंबरोबर सर्वस्व झोकून काम केलेले आहे. ठाकरे कुटुंबात काम कसं चालतं, हे मला चांगलं माहिती आहे. पुन्हा तसा अनुभव घेण्याची माझी तयारी आहे, असं मला वाटत नाही. काही झालं तरी शेवटी बोलूनचालून तुम्ही ठाकरेच, असं बोलून नारायण राणे तिथून बाहेर पडले.
राणेंना मंत्रिपद देऊन भाजपने सेनेला काय संदेश देणार ?
राजकीय विश्लेषकांच्या मते राणेंना केंद्रात मंत्रिपद दिल्याने पहिली शक्यता म्हणजे भविष्यात सेना-भाजप युती होईल या चर्चेला ब्रेक लागेल. कारण नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यात वैयक्तिक कटुता आहे. वैचारिक मतभेद वगैरे नाहीयेत. उद्धव ठाकरेंवर नारायण राणेंनी व्यक्तिगत स्वरूपाची टीका केलीये. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात तर आदित्य ठाकरेंवर त्यांनी थेट आरोप केले होते. त्यामुळे राणेंसोबत कोणत्याही पद्धतीने जोडले जाणे उद्धव ठाकरे पसंत करणार नाहीत.
दुसरी शक्यता म्हणजे भविष्यात युती झालीच तर ती आपल्याच अटीशर्तींवर होईल, असा संदेशही भाजप शिवसेनेला देऊ पाहत आहे. उद्धव ठाकरे यांचे नारायण राणेंसोबत कितीही मतभेद असले, तरी आम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो आम्ही घेणारच असा ठामपणा दाखवत भाजप आपण युती करताना नमतं घेणार नाही किंवा तडजोड करणार नाही असं सांगू पाहात आहे.