मुंबई - शहरातील सर्वात मोठ्या बीकेसी जम्बो कोविड सेंटरवर मनसेने गंभीर आरोप केले होते. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र देखील लिहिले होते. मात्र, अनेक दिवस विषय लावून धरूनही कोणतेही उत्तर न मिळाल्याचा आरोप करत मनसे नेते संदीप देशपांडेंनी पत्रकार परिषद घेतली. बीकेसी कोविड सेंटरची परस्थिती एका आठवड्यात सुधारली नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करू असा इशारा त्यांनी सरकार आणि पालिकेला दिला आहे.
जोडलेले हात सोडायला लावू नका -
काही दिवसांपासून हात जोडून यावर कारवाई व्हावी यासाठी विनंती करत आहोत. मात्र, जोडलेले हात सोडायला लावू नका. ज्या कामगारांना कामावरून काढले आहे, त्यांची माफी मागा. तुमचे चुकीचे धंदे जर कोण सांगते, तर त्याला तुम्ही कामावरून काढणार का? बीकेसी कोविड सेंटरचे प्रमुख आणि कॉन्ट्रॅक्टर्सला पुढच्या सोमवारपर्यंत वेळ देत आहोत. झालेल्या चुका त्यांनी पुन्हा तपासाव्या, नाही तर जम्बो कोविड सेंटरच्या बाहेर धरणे आंदोलन करु. आम्हाला राजकारण करायचे नाही, म्हणून आम्ही एका आठवड्याची मुदत देत आहोत असे ते म्हणाले.
कॉन्ट्रॅक्टरला अभय का ?
कॉन्ट्रॅक्टर नवाब मलिकांचा जवळचा म्हणून त्याला तुम्ही अभय देणार आहात का? नवाब भाईंनी घोटाळा केला असे आम्ही कुठे बोलत आहोत. जर डॉ. डेरे असे म्हणत असतील की हा कॉन्ट्रॅक्टर नवाब मलिकांचा आहे, म्हणून मी कारवाई करु शकत नाही. तर नवाब भाईंनी सांगावे डेरेंना कारवाई करायला. तिथे जे डॉक्टर असायला पाहिजेत त्यांनी ते डॉक्टर पुरवले पाहिजेत एवढीच मागणी असून डेथ रेट आहे तो कमी झाला पाहिजे, असेही देशपांडेंनी सांगितले.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
बीकेसी कोविड सेंटरमध्ये 90% डॉक्टर BDS, BAMS, BUMS, BHM आहेत. हे डॉक्टर गंभीर स्वरूपाच्या रुग्णांवर उपचार कसे करणार? असा प्रश्न मनसे नेते अखिल यांनी उपस्थित केला होता. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून गरज लागल्यास आम्ही स्वतः नामवंत डॉक्टरांची फौज उभी करू असे म्हटले होते. मात्र, आम्हाला प्रशासन सहकार्य करत नाही, असा आरोप त्यांनी या पत्रात केला आहे. अनेक दिवस उलटून गेले असतानाही पत्राला कोणतेही उत्तर आलेले नाही. ॲडमिन विभागातील काही कर्मचाऱ्यांनी काही माहिती उपलब्ध करून दिली, त्यांच्यावरच कारवाई होत असल्याचे दिसत आहे. यामुळे आतातरी या बीकेसी कोविड सेंटरवर कारवाई करावी, यासाठी पुन्हा चित्रेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे.