मुंबई - अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) मेट्रो 7 चे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) कडून सुरू आहे. लवकरच हा मार्ग सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या मार्गाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावी अशी मागणी जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रवींद्र वायकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत यासंबंधीचे निवेदन वायकर यांनी दिले आहे. तर एमएमआरडीएकडेही अशी लेखी मागणी त्यांनी केली आहे.
या वर्षात सुरू होणार मार्ग
मेट्रो 7 चे काम वेगात सुरू आहे. मात्र कॊरोनाचा मोठा फटका या प्रकल्पाला बसला. त्यामुळे डिसेंबर 2020 ची डेडलाइन मे 2021अशी झाली आहे. पण आता ही डेडलाइनही गाठणे एमएमआरडीएला शक्य होण्याची शक्यता नाही. कारण आज 14 जानेवारीला मेट्रो 7 ची ट्रायल रन होणार होती. पण मेट्रो गाडीच अजून आलेली नाही. तर कामही बरेच बाकी आहे. त्यामुळे आजची ट्रायल रन केव्हाच रद्द करण्यात आली आहे. तर ही ट्रायल रन आता मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रकल्पाची डेडलाइन ही आता काही महिने पुढे जाण्याची शक्यता आहे.
म्हणून मेट्रो 7 ला बाळासाहेबांचे नाव
बाळासाहेब ठाकरे यांचे सामाजिक, राजकीय क्षेत्रातील काम बहुमूल्य आहे. तर त्यांनी सातत्याने दळणवळणाची साधने विकसित केल्याशिवाय राज्याचा विकास होणार नाही अशी भूमिका घेतली. त्यानुसार मुंबईत उड्डाणपूल असो वा इतर वाहतूक सुविधा प्रकल्प हे त्यांच्या प्रेरणेतुन मुंबईत उभारण्यात आल्याचे म्हणत वायकर यांनी मेट्रो 7 ला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. तर या मागणीवर नुकतीच एमएमआरडीएच्या बैठकीत चर्चा झाल्याचे ही त्यांनी सांगितले आहे. तेव्हा आता मुख्यमंत्री काय आणि कधी निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे आहे.
हेही वाचा - सोमवारपासून मेट्रो वनच्या 30 फेऱ्या वाढणार, 200 वरून आता 230 फेऱ्या
हेही वाचा - राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ