मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी केलेल्या भाजपसोबतच्या युतीबद्दल (Shivsena BJP Yuti) आम्हाला अभिमान आहे. मात्र, उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची शिवसेना लाचार असल्याचा आरोप भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला आहे. कार्टूनच्या (Cartoon) माध्यमातून प्रमोद महाजन (Pramod Mahajan) अथवा भाजपची बदनामी करणाऱ्या संजय राऊत यांची महाजनांच्या पायाशी जाण्याची योग्यता आहे का? असा परखड सवालही शिलार यांनी उपस्थित केला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या युतीचा शिवसेनेला विसर पडला आहे. सत्तेसाठी लाचारी म्हणजे काय करावे लागते हे आता शिवसेना दाखवत आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेने जाज्वल्य हिंदुत्वाची सुवर्णफुले निर्माण केली होती. ती सुवर्णफुले आताच्या शिवसेनेला निर्माल्य वाटत आहे, हे शिवसेनेचे दुर्दैव आहे, अशी टीका आमदार शेलार यांनी केली आहे.
- महाजनांच्या पायाजवळ जाण्याची राऊतांची योग्यता आहे का?
जुन्या काळातले संदर्भ असलेले एक कार्टून आता मुद्दाम प्रसारित केले जात आहे. यामागे संजय राऊत यांचा काय हेतू आहे? कार्टूनच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याला आमचा विरोध नाही, पण यामागे कारण काय आहे ते स्पष्ट करावं. काही तरी पुढे करून पळून जायचं ही संजय राऊत यांची सवय आहे. प्रमोद महाजन यांच्या पायाजवळ जाण्याची राऊत यांची पात्रता आहे का? असा सवालही शेलार यांनी उपस्थित केला आहे.
- बाळासाहेबांच्या युतीबद्दल अभिमान -
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत केलेल्या युतीचा आम्हाला अभिमान आहे. मात्र, आता हिंदुत्वाच्या नावाने राजकारण करणाऱ्या शिवसेनेने शहाबानोच्या केसमध्ये काय केले हे स्पष्ट करावे. राम जन्मभूमी आंदोलनांमध्ये शिवसेना कुठे होती? कारसेवकांवर अन्याय झाला तेव्हा शिवसेना कुठे होती? समग्र हिंदुस्तान एकत्र येण्यासाठी भाजप लढत होती तेव्हा शिवसेना कुठे होती? असे सवालही शेलार यांनी उपस्थित केले आहेत.
- आता शिवसेनेची दुटप्पी भूमिका का?
याकूब मेनन सारख्या डॉनचे समर्थन करणाऱ्या मुंबईचे पालकमंत्री असलेल्या असलम शेख यांनी आता टिपू सुलतानच्या नावाने बांधकाम सुरू केले आहे. शिवसेना आता का लाचारी पत्करून गप्प आहे? सत्तेसाठी शिवसेनेने दुटप्पी भूमिका घेतली आहे का? असा सवालही शेलार यांनी केला.