मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांचा संपावरून राजकीय पोळी भाजा, पण पोळी जळणार नाही याची काळजी घ्या, अशी टीका परिवहन मंत्री अनिल परब यांनी विरोधी पक्षावर केली आहे. आज एसटी कर्मचाऱ्यांचा संपावर तोडगा (Minister Anil Parab) काढण्यासाठी मुंबई सेंट्रलच्या एसटी मुख्यालयात परिवहन मंत्री अनिल परब (st workers strike) यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत महाराष्ट्र एसटी कनिष्ठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर आणि वरिष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते उपस्थित होते.
हेही वाचा - पालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णाच्या पोटातून काढला तब्बल 10 किलो 600 ग्रॅमचा गोळा
आम्ही कर्मचाऱ्यांचे नुकसान करू इच्छित नाही
एसटी कामगारांच्या २८ युनियन आहेत. त्या सर्वांच्या प्रतिनिधींसोबत बसून सरकारने कामगारांच्या अनेक मागण्या मार्गी लावल्या आहेत. विलिनीकरणाच्या व्यतिरिक्त आणखीही कुठले मुद्दे असतील तर, त्यावरही चर्चा करण्यासाठी आम्ही तयार आहोत. एसटी कर्मचाऱ्यांचे नुकसान करू इच्छित नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर सरकारची आडमुठेपणाची भूमिका नाही. न्यायालयाच्या सूचनेनंतर विलिनीकरण्याच्या संदर्भात अभ्यास समिती नेमली आहे. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी 12 आठवड्यांचा वेळ दिला आहे. समितीचा अहवाल आल्यावर मुख्यमंत्र्यांना हा अहवाल सादर करू. त्यानुसार एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाचा पुढील निर्णय घेतला जाईल, असे परब यांनी स्पष्ट केले. मात्र, या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर, सरकारची दारे चर्चेसाठी खुली आहेत. आम्ही कर्मचाऱ्यांचे नुकसान करू इच्छित नाही, अशी माहितीसुद्धा परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज दिली.
चर्चेशिवाय निर्णय होणार नाही
परब यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सध्या कामगारांचे नेतृत्व करणारे गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) व सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्याशी मी दोन वेळा चर्चा केली. सरकारचा दोन्ही वेळचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. मात्र, दोन्ही वेळा कामगारांशी बोलून सांगतो, असे आम्हाला सांगण्यात आले. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत सरकारची आडमुठेपणाची भूमिका नाही. विलिनीकरणाचा निर्णय चर्चेशिवाय होणार नाही. जे नेते आज एसटी कर्मचाऱ्यांची माथी भडकवत आहेत नंतर ते नेते मंडळी साथ देणार नाही. त्यामुळे, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर राजकीय पोळी भाजा, पण पोळी जळणार नाही याची काळजी घ्या, अशी टीका परिवहन मंत्री अनिल परब यांनी विरोधी पक्षावर आज मुंबई सेंट्रल येथे केली.
हेही वाचा - दहिसर रेल्वेस्थानकावर पोलिसाने पाठलाग करत चोराला पकडले; घटना सीसीटीव्हीत कैद