मुंबई - अनलॉकनंतर हळूहळू मुंबई आता पूर्वपदावर येताना दिसत आहे. 15 ऑक्टोबरला सरकारने मुंबईत मेट्रो सुरू करण्यासाठी परवानगी दिली होती. आज तब्बल 7 महिन्यानंतर मुंबईत मेट्रो धावली. आज सकाळी साडेआठला पहिली मेट्रो प्रवाशांच्या सेवेत हजर झाली. मेट्रोमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
मात्र दुसरीकडे तब्बल सात महिन्यानंतर आज मेट्रो सुरू झाली असली, तरी प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर घरीच बसणे पसंत करत असल्यामुळे मेट्रोला गर्दी नसल्याचे पाहायला मिळत आहे. मेट्रोने मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेतली आहे. मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल) ने आवश्यक ते सर्व बदल मेट्रो स्थानकापासून ते मेट्रो गाडीपर्यंत केले आहेत. मेट्रोची प्रवाशी क्षमता 50 टक्के करण्यात आली आहे. एक सीट सोडून दुसऱ्या सीटवर बसणे प्रवाशांना बंधनकारक करण्यात आले आहे. मेट्रो स्थानक आणि मेट्रो गाडीत स्वच्छता राखली जात असून गाडीचे निर्जंतुकीकरण नियमितपणे केले जात आहे. तर फेऱ्यांचीही संख्या कमी करून 400 हून 200 इतकी करण्यात आली आहे. मेट्रोच्या तिकीटासाठी प्रवाशांना जास्तीत जास्त प्रमाणात डिजीटल पेमेंट प्रणाली वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.