मुंबई - पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकाबाहेर (Churchgate Station Fire) आज अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे (Fire Brigade) अधिकारी आणि कर्मचारी दाखल होऊन लगेच आगीवर नियंत्रण मिळवले आहे. या घटनेत जीवितहानी झालेली नाही. मात्र, घटनेमुळे स्थानकाबाहेर असलेल्या नागरिकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाची पोलीस तपास करत आहेत.
- जीवितहानी नाही-
मिळालेल्या माहितीनुसार, चर्चगेट रेल्वे स्थानक येथे दररोज नोकरदार, कर्मचारी, महिला प्रवासी आदींची गर्दी असते. येथील गेट क्रमांक ३ येथे आज दुपारी १ वाजून ४५ वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे समजते. या आगीच्या घटनेमुळे चर्चगेट रेल्वे स्थानक परिसरात खळबळ उडाली. रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस, बेस्ट व वार्डातील पालिका कर्मचारी, स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आगीवर लगेच नियंत्रण मिळवले आहे. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही, असे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.
- चौकशी सुरू- .
अग्निशमन दलाच्या जवानांनी युद्धपातळीवर मदतकार्य करून अवघ्या ३० मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले व आग विझवली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या आगीत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, ही आग का व कशी लागली याबाबतची चौकशी स्थानिक पोलीस, अग्निशमन दलाकडून करण्यात येत आहे.