मुंबई - मुंबईमध्ये गेल्या दहा महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे दहा महिन्यांपासून मुंबईची लोकल ट्रेन सर्वसामान्य मुंबईकरांसाठी बंद आहे. मात्र आता मुंबईमधील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. त्यामुळे येत्या २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान सामान्य नागरिकांसाठी लोकल सुरू होऊ शकते, अशी शक्यता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी वर्तवली आहे.
मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक प्रणाली वापरली जात होती. मात्र कोरोनाचा प्रसार होईल म्हणून ही प्रणाली बंद ठेवण्यात आली आहे. हजेरीसाठी फेस रिडींगची नवी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीचा महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते डी विभाग कार्यालय येथे शुभारंभ करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या.
ट्रेन सुरु होण्याची शक्यता
यावेळी बोलताना महापौर म्हणाल्या की, लोकल सुरू करण्याबाबत मी कालच एक बातमी ऐकली, आज पालिका आयुक्तांनी एक बैठक बोलावली आहे. बैठकीला आम्हालाही बोलवले आहे. यावरून कदाचित २९ जानेवारी ते १ फेब्रुवारीपासून लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे. जरी लोकल सुरू झाल्या तरी लोकांनी आपली काळजी घेतली पाहिजे. तोंडावरचा मास्क आणि हातात सॅनिटायझर तुमच्या जवळ असले पाहिजे, सोशल डिस्टंन्सिंगचे पालन देखील महत्त्वाचे आहे, असे आवाहन देखील यावेळी महापौरांनी केले.
शाळा सुरू करू नयेत
राज्यातील शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत. मुंबईत लोकल ट्रेन सुरू करण्याच्या हालचालही सुरू असताना शाळा सुरू होणार का? यावर बोलताना महापौर म्हणाल्या की, कोरोनाचा प्रसार कमी झाला असला तरी कोरोना पूर्णपणे गेलेला नाही. लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने शाळा सुरू करण्याबाबत सावकाश निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान शाळा सुरू करण्याबाबतचे हे माझे वैयक्तीक मत असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.