मुंबई - कोरोना संक्रमणाची लाट थांबवण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न सुरू असताना मुंबई पोलिसांकडून मुंबईत कलम 188 नुसार नियमाचे उल्लंघन करणाऱ्या आरोपींच्या विरोधात कारवाई केली जात आहे. दक्षिण, मध्य, पूर्व, पश्चिम, उत्तर अशा मुंबईतील परिसरामध्ये 24 तासात 204 गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. यामध्ये सर्वाधिक गुन्हे पश्चिम मुंबईत नोंदविण्यात आलेले आहेत. गेल्या 24 तासात पश्चिम मुंबईत 102 गुन्हे कलम 188 नुसार नोंदविण्यात आले आहेत.
मुंबईच्या वेगवेगळ्या विभागात अशी झाली कारवाई -
मुंबई शहरात कोरोना रुग्ण संदर्भात हॉटेल आस्थापण विहित वेळेपेक्षा अधिक वेळ सुरू ठेवणे, इतर दुकाने, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे, अवैध वाहतूक, मास्क न वापरणे व इतर प्रकरणांमध्ये 24 तासात दक्षिण मुंबईत 42 गुन्हे नोंदविण्यात आले असून, मध्य मुंबईत 12, पूर्व मुंबईत 35, पश्चिम मुंबई 102, उत्तर मुंबई 13 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. 20 मार्च 2020 ते 17 एप्रिल 2021 च्या दरम्यान मुंबई शहरात 29055 गुन्हे हे नोंदवण्यात आलेली असून यामध्ये सर्वाधिक गुन्हे उत्तर मुंबई 10968 नोंदविण्यात आले आहे. पश्चिम मुंबईत 4366 , पूर्व मुंबई 4014, मध्य मुंबई 3009 उत्तर दक्षिण मुंबईत 6698 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
188 कलमाचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल 9 हजार फरार आरोपींचा शोध सुरु -
20 मार्च 2020ते 18 एप्रिल 2019 पर्यंत मुंबई शहरात कलम 188 नुसार आतापर्यंत तब्बल 61847 गुन्हे दाखल करण्यात आलेली असून यामध्ये 9221फरार आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. आतापर्यंत 24014 आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले असून तब्बल 28612 आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे .